काव्यसंमेलन; नवकवींच्या कवितांनी आणली काव्यमैफिलीत रंगत!
कणकवली
प्रत्येकाच्या आतच एक कविता असते. मात्र ती दबलेली असते. आणि तिचं मूर्त रूप वेगवेगळं असतं. एक झाड लावणं ही देखील एक कविता आहे. कष्टानं फुलविलेलं शेत किंवा ओबडधोबड पाषाणातून साकारलेलं सुंदर शिल्प हीदेखील एक कविताच आहे. जेव्हा तुमची कविता अनुभवाचे व्यापक अवकाश कवेत घेते तेव्हा ती कविता तुमची ओळख बनते. आपल्या कवितेला आपला प्रामाणिक आवाज हवा. तुमची कविता ही तुमची ओळख बनण्यासाठी कवितेच्या प्रेमात राहा, असे प्रतिपादन कवयित्री सरिता पवार यांनी केले. काव्यप्रभा कवीसंमेलन कवयित्री सरिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सहभागी कवींना कवितेविषयी मार्गदर्शन केले.
३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे युवकांसाठी अन् ज्येष्ठांसाठी जिल्हास्तरीय ‘काव्यप्रभा’ काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ३० युवा अन् ज्येष्ठ कवींच्या कवितांनी या सोहळ्यात रंगत आणली. या काव्यसोहळ्याला गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी, प्रा. विनायक टाकळे हे उपस्थितीत होते.
कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कवीसंमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. संविधान संवादक सुजय जाधव यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेची शपथ दिली. कविता ही आपल्या आतील हुंकार असतो. सर्वच ठिकाणी कविता असते. पण तिला शोधावं लागतं. भुकेल्या जीवाला पोटभर अन्न दिलं तरीही त्याची कविता तयार होते. कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करत असताना कोणाचे गुलाम होऊ नका किंवा कोणत्याही कळपाचा अथवा कंपूचा भाग बनू नका. गुलामगिरी करणाऱ्या कवितेचे आयुष्य फार जास्त नसते. त्यामुळे तुमची प्रतिभा जोपासा. बदलणाऱ्या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस आपल्या कवितेमध्ये असावे, असे प्रतिपादन सरिता पवार यांनी केले.
गोपुरी आश्रम येथे वाचन संस्कृतीच्या चळवळीतून एकत्र आलेल्या तरुणाईने साद टीमची निर्मिती केली आणि त्या आधारे त्यांनी तरुणाईसाठी काम करायचे ठरवले. पुस्तकांच्या संगतीत माणसाला पोषक विचार मिळतात. त्यामुळे पुस्तकांची सोबत करा. जिल्ह्यातील काव्यप्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी काढले. प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतंच. म्हणून खचून जाऊ नये. त्याचा कसोशीने सामना करायला हवा. ज्याप्रमाणे आपलं कौतुक करणारी माणसं आपल्या सोबत असावी असं वाटतं, तशीच ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ याप्रमाणे आपली निंदा करणारीही माणसं जवळ असावी. कारण त्यांच्या निंदेमुळे आपल्याला नवी जिद्द मिळत असते, असे म्हणत या काव्यसंमेलनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन करणारे अनेक कवी निर्माण होतील, असा आशावाद अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी व्यक्त केला. वामनराव महाडिक महाविद्यालय तळेरे येथील प्रा. विनायक टाकळे यांचीही या कविसंमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभली होती. अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांनी आयोजित केलेल्या काव्यसंमेलनामुळे जिल्ह्यातील नवकवींना व्यासपीठ मिळाल्याचे गौरवोद्गार काढत आपल्या कवितांनी त्यांनी काव्य मैफिलीत रंगत आणली. यावेळी जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुराद अली शेख, वामनराव महाडिक महाविद्यालय तळेरेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, प्रा. किशोर कदम उपस्थित होती.
अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर यांनी प्रस्तावना मांडली. सोबत अनुभव शिक्षा केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. साद टीम कणकवलीचे समन्वयक श्रेयश शिंदे यांनी साद टीम करत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांविषयी माहिती दिली. काव्यसंमेलनात सहभागी कवींनी सामाजिक, स्त्रीवादी, निसर्ग प्राधान्य असलेल्या विविध विषयांवरील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सोबतच त्यांच्या कवितेला एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवलीचे आभार मानले. सहभागी सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. साद टीमच्या मधुरा गावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार अनुभव साथी श्रद्धा पाटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साद टीमचे अक्षय मोडक, सुजय जाधव, प्रियांका मेस्त्री, वृदाली हजारे, अनुभव साथी जयराम जाधव, गोपुरी आश्रमाचे बाबू राणे यांनी मेहनत घेतली. त्यासोबतच गोपुरी आश्रम आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांनी सहकार्य केले.