You are currently viewing नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर कणकवली शहरातील वीज पुरवठा सुरू

नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर कणकवली शहरातील वीज पुरवठा सुरू

गणेशोत्सव कालावधीत वीज दुरुस्तीची कामे नकोत – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

शहर आणि तालुक्याचा वीज पुरवठा आज सकाळी साडेनऊ वाजता खंडित करण्यात आला होता. वीज दुरुस्तीची कामे सुरू असल्याने सायंकाळपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार होता. ही बाब लक्षात येतात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला आणि तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास कणकवली शहरासह तालुक्याचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

गणेश चतुर्थी ला अवघे दोन दिवस राहिले असताना देखील आज सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या विरोधात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांच्या कोविड कालावधीनंतर यावर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना गेली दोन वर्ष महावितरणचे अधिकारी दुरुस्ती ची कामे करण्याकरता कुठे गेले होते? असा सवाल श्री. नलावडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपस्थित केला. दरम्यान श्री.नलावडे यांनी गणेश चतुर्थी करिता बाजारपेठ सज्ज झाल्या असून, व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना आणि चतुर्थीच्या तोंडावर विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्यापारी कोविड मुळे हवालदिल झालेले असताना या कोविडच्या महामारीनंतर व्यापारी यावर्षी तरी व्यवसाय चांगला होईल या आशेने आहेत. असे असताना दुरुस्ती च्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला तर त्याचा बाजारपेठांवर मोठा परिणाम होणार आहे. विद्युत उपकरणे या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना त्या व्यवसायिकांना देखील याचा फटका बसणार आहे. मेंटेनेस करायचा होता तो गेल्या दोन वर्षात का केला नाही? असा खडा संवाल देखील श्री. नलावडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला. गणेश चतुर्थी काळात विद्युत पुरवठा खंडित करू नका. तसेच झाल्यास जनतेचा उद्रेक होईल असा इशारा देखील नलावडे यांनी दिला.

गणेश चतुर्थी हा कोकणात सर्वात मोठा सण असून, या काळात महावितरण जर सोमवारचा दुरुस्ती च्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित करत असेल तर महावितरण ला याकरिता आमच्या स्टाईलने जाब विचारावा लागेल असा इशारा देखील नलावडे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा