*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची अप्रतीम अभंग रचना*
*मास श्रावणाचा*
श्रावणाचा मास | आनंद उल्हास |
निसर्ग आरास | ठायी ठायी ||१||
जाई जुई फुले | पारिजात खुले |
चांदणं फुलले | धरेवरी ||२||
शिवाला पुजिती | माऊली जिवती |
आनंदे रंगती | पूजेमध्ये ||३||
सागर पूजन | भावाला औक्षण |
जन्माष्टमी सण | आनंदाचा ||४||
पंचमीचा सण | जीवांचे जतन |
आनंदाचे धन | माहेरात ||५||
ज्योत्स्ना तानवडे. पुणे