*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बैलपोळा*
सण असे आनंदाचा
बैलांसाठी बैलपोळा
होती साजरा करण्या
मुले, माणसेही गोळा ll १ ll
शेतकरी राजा माझा
दिसे खुश आज भारी
कृतज्ञता बैलांप्रती
दाखविण्या संधी न्यारी ll २ ll
काय जाहले तरीही
राबे सर्जा बारा मास
तुझ्या जीवावर खाती
माझी पोरं चार घास ll ३ ll
सर्जा, राजाच्या जोडीला
मिळे आज खूप मान
झुली, बाशिंगे बांधून
शिंगे रंगविली छान ll ४ ll
सण एका दिवसाचा
बाकी वर्षभर काम
कोण ऐकतो व्यथेला
नाही कशातच राम ll ५ ll
वेग वाढण्या कामाचा
उठे आसुडाचा वळ
मुकेपणी सोसतो हा
ऊन – पावसाची झळ ll ६ ll
बळीचेही त्यांच्यासाठी
तुटे तीळ तीळ मन
करी साजरा म्हणुनी
आनंदाने पोळा सण ll ७ ll
सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.