You are currently viewing गडनदी पुलानजीक झालेल्या अपघातात कंटेनरच्या धडकेने कार चालक जागीच ठार

गडनदी पुलानजीक झालेल्या अपघातात कंटेनरच्या धडकेने कार चालक जागीच ठार

कणकवली

गोव्याच्या दिशेने मालवाहतूक करणार्‍या कंटेनरची समोरून येत असलेल्या क्रुझर चारचाकीला जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला.
येथील गडनदी पुलानजीकच्या वळणावर शुक्रवारी दुपारी २.३० वा. सुमारास झालेल्या या अपघाताची भीषणता एवढी होती की, चारचाकीचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. परिणामी डोकीला गंभीर दुखापत होऊन चालक प्रशांत प्रभाकर सावंत (४७, नरडवे व सध्या रा. कणकवली यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गडनदी पुलापुढे वागदे गावाच्या हद्दीत हायवेची एक लेन बंदावस्थेत आहे. येणारी – जाणारी वाहने एकाच लेनवर येत असल्याचे सातत्याने अपघात घडत असतात. या अपघातालाही हायवे प्रशासनाचा निष्काळजी पणा कारणीभूत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ही बंद लेन सुरू केली जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलायला देणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.

यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश ढवळ, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, विलास गावकर, बाबू सावंत, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे आदींसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते

प्रतिक्रिया व्यक्त करा