*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी दीपक पटेकर लिखित भारतीय मातृदिन विशेष लेख.*
*मातृदिन…..!*
*जन्म दिला जिने आपणा*
*गाऊ अभिमाने तिचे गुणगान*
*किती उपकार करो कुणीही*
*माता तिन्ही लोकी असे महान*
मातृदिन….!
मातृदिन कधीच एक खास दिवस असूच शकत नाही…..तर ज्या मातेने नऊ महिने नऊ दिवस मुलाला आपल्या उदरात वाढविते…असंख्य यातना…वेदना सोसून हे सुंदर जग दाखविले…तिचा दिवस तर रोजच असावा….!
*प्रसवकळा सोसुनिया आई*
*बाळास पाहता आनंदाश्रू गाळते*
*भरलेल्या डोळ्यात आईच्या*
*आईपणाची महती कळते*
भारतीय पंचांग मध्ये मातृदिन हा श्रावण महिन्यातील दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी मातृदिन नोंद असणे म्हणजे प्राचीन काळापासून मातृदिन साजरा करण्याची प्रथा असावी. ज्या मातांची मुलं अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही अशा माता पिठोरी अमावस्येचे व्रत करतात तर काही माता आपल्या अपत्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात… म्हणून हा दिवस मातृदिन समजला जातो…या दिवशी आपल्या मातेचे आशीर्वाद घेऊन तिच्या ऋणांची जाण ठेऊन…तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. जागतिक मातृदिन हा जरी मे महिन्यात दुसऱ्या रविवारी साजरा केला गेला तरी एक भारतीय म्हणून मातृदिन हा श्रावण पिठोरी अमावस्येलाच…!
माणूस जन्माला येतो तो कुटुंबात, परंतु त्या कुटुंबाचा खरा आधारस्तंभ असते ती माता. जरी कुटुंबातील मुलांची ती जन्मदात्री असली तरी संपूर्ण कुटुंबाची माता म्हणूनच घराची, कुटुंबाची सर्व जबाबदारी ती स्वतःच्या खांद्यावर पेलते. चार भिंती उभ्या केलेलं मातीचं घर असू शकेल परंतु मातेविना त्याला घरपण येत नाही…आणि कुटुंब होत नाही.
*आई माता जननी*
*रूपे तिची अनेक*
*वर्तनातून दिसती*
*संस्कार तिचे नेक*
मातेने केवळ संततीला जन्म दिला नाही तर आपल्या अंगावरील दूध पाजून तिला जगवलं…लहानाचे मोठे करत भाषा ज्ञान दिलं…संस्कारांच बाळकडू पाजून अव्याहत श्रम घेत सतत प्रगतीकडे नेण्याचं काम केलं… पृथ्वीतलावर निस्वार्थी कुठलं नातं असेल तर ते मातेचं…!
आई साक्षात रूप देवीचे…आई वात्सल्याची मूर्ती…आई माया ममतेचा सागर….आई बाळासाठी स्फूर्ती…!
कुटुंबासाठी स्वतःला वाहून घेतलेली माता म्हणजे अव्याहतपणे वाहणारी सरिता…असंख्य दगड गोट्यांना आदळत…आपटत जातानाही…निर्मळ जलाभिषेक करणारी…तृष्णा भागवणारी…काशी…कृष्णा…गोदावरी..! जमिनीला पाठ टेकली तरी… तिला चिंता सकाळी उठण्याची…
कण्हत कण्हतच डोळे मिटते… उसंत एक झोप लागण्याची…
अन् तिची पहाट होण्याची.
*आयुष्यभर कष्ट उपसून ती कुटुंबाला निवांत झोप देते…तरी आई असेपर्यंत आईची महती कुणाला कळते?*
घरासाठी स्वतःला जाळते…तरीही धग कुणाला लागू देत नाही…
कसलीही अपेक्षा नसते तिची…अपेक्षांवर जीवनाला जगू देत नाही…
*हेच जिणं आईचं…कधीतरी जगून घ्यावं..*
*म्हणून म्हणतो एकदा… आई होऊन पहावं…*
आजही भारतीय संस्कृतीमध्ये आई ही जन्माची शिदोरी आहे…जी उरतही नाही आणि आयुष्याला पुरतही नाही….तिच्या ऋणांतून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. संपूर्ण जगाला भारतीय मातृदिन ज्ञात करून दिला पाहिजेच…परंतु त्यासाठी सर्वप्रथम आपल्या प्राचीन पंचांगांमधून नोंद असलेला भारतीय मातृदिन आपण आवर्जून मानला पाहिजे…! आपल्या कृतीतून, कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त करून मातेचा आशीर्वाद घेतला पाहिजे…!
*तूच माता तूच आई…*
*तूच जगत जननी…*
*आठव सदा तुझी राहो..*
*सुखाच्या प्रत्येक क्षणी…*
©【दिपी”】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६