*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मंदीर*
आत्ता कुठं मंदिराचा दरवाजा ही उघडला गेला
घरातून निघताना शिंपडलेला
सेंट चा वास उडून गेला
आत्ता कुठं मंदिराचा…..
निघालेल्या वाटे वरती
कधी उतार चढ होता
कधी कुणाची संगत होती
कधि रस्ता ही चुकला होता
वाकडी वळणे असणारच की
तरी ही प्रवास घडला गेला
आत्ता कुठं मंदिराचा……
वाटेवर कधी थकून जाता
विसावा ही घेता आला
भोंवतालचा निसर्ग सुद्धा
मनोमन पाहून झाला
सहज पणे किल्मिषांचा पाचोळा अंगावर उडला गेला
आत्ता कुठं मंदिराचा……
अंगभर लोभाची धूळ उडली
मोहाची कधि किरणे पडली
कधि स्वार्थाच्या ओहोळांनी
मधेच कुठे वाट हि अडली
उगा कुणाशि झगडा झाला जीव कुणावर जडला गेला
आत्ता कुठं मंदिराचा…..
कधि विभ्रमांचा ही भास होता
तरि दर्शनाचा ही ध्यास होता
भूक मायेची अघोरी होती
पण भक्तिची शिदोरी होती
गुरु सेवेचा छंद जिवाचा नाही कुठे ही नडला गेला
आत्ता कुठं मंदिराचा……
ठाउक नव्हते कसे जायचे
अजुन किती ते चालायाचे
नको काय अन् काय हवे ते
आणि न्यायचे काय सवे ते
गुरू कृपेने ईश कृपेचा मार्ग मला सांपडला गेला
तेंव्हा कुठं मंदिराचा दरवाजा ही उघडला गेला
अरविंद