You are currently viewing गणेश चतुर्थी सणाच्या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा ठेवावा

गणेश चतुर्थी सणाच्या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा ठेवावा

– सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने वीज वितरणला निवेदन सादर

सावंतवाडी

गणेश चतुर्थी सणाच्या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा ठेवावा तसेच सणासूंदीचे दिवस असल्यामुळे वीज जोडणी कापण्याची कारवाई करू नये अशी मागणी सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात येत आहे.
वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास सांगण्यास इच्छितो की गणेश चतुर्थीचा सण थोड्याच दिवसावर येऊन ठेपला आहे. या काळात तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसेच महागाईमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे अनेक ग्राहकांनी थकीत वीज बिल मुदतीत भरलेली नाहीत परिणामी त्यांची वीज जोडणी कापण्याची कारवाई ऐन सणासुदीत हातात घेऊ नये. जर ही कारवाई तालुक्यात सुरु असले तर ती त्वरित थांबवावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने व वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता बेहाल असताना वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात येत आहे. ही कारवाई त्वरित थांबवण्यात यावी हे थकीत बिल भरण्यासाठी गणेश चतुर्थी काळात ग्राहकांवर दबाव न आणता त्यांना वाढीव मुदत देण्यात यावी सक्तीने कारवाई करू नये अशी मागणी आम्ही सावंतवाडी तालुका मनसेच्या वतीने करत आहोत.
सावंतवाडी तालुक्यातील गावपातळीवरील विद्युत पुरवठा हा अनियमित असून विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे तरी देखील वाढीव दराने ग्राहकांच्या माथी वीज बिले मारली जात आहे. यावर आपण त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा केबल लगत असलेली झाडे वाढलेली असून त्यामुळे विद्युत पुरवठा सतत खंडित होतो व त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. अवघ्या काही दिवसांवर येणारा गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. सध्या गणेश मूर्ती शाळांमध्ये गणेश मुर्त्या बनविण्याची लगबग रात्रंदिवस सुरू असताना वीज पुरवठा खंडित होऊन व कमी होल्टेज होत असल्याने वीज कमी दाब स्वरूपात चालते या सगळ्याचा गणेश मूर्ती शाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता संबंधित कर्मचार्‍यांना योग्य त्या सुचना द्याव्यात.आवश्यक ठिकाणी अधिक कर्मचारी तैनात ठेवावेत.
तसेच आपण संपूर्ण तालुक्यातील विद्युत यंत्रणेची पाहणी करून योग्य ती उपाययोजना करावी तरी वरील सर्व बाबी लक्षात घेत सर्व कामे गणेश चतुर्थीपूर्वी व्यवस्थित करून घ्यावी व गणेश चतुर्थीच्या काळात वीज पुरवठा अखंडित सुरू राहील याची खबरदारी घ्यावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर विभागअध्यक्ष मंदार नाईक उपशहर अध्यक्ष शुभम सावंत सचिव कौस्तुभ नाईक प्रसाद परब प्रवीण गवस प्रसाद मिशाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा