You are currently viewing सांठा उत्तराची कहाणी

सांठा उत्तराची कहाणी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर यांचा श्रावणमास निमीत्ताने लिहिलेला अप्रतिम लेख

|| सांठा उत्तराची कहाणी ||

रिमझिम पाऊस,आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य,हिरव्या वृक्षराजीतून उमटणारे ऊनकवडसे, हिरवाईने नटलेला निसर्ग,लवलवणारी तृणपाती, रंगबिरंगी फुलांचे ताटवे,खळाळणारे नदी,निर्झर हा असा मस्त ओला, मनभावन श्रावण! चैतन्याची लयलूट करणारा श्रावण! याबरोबरच श्रावणी सोमवारी शिवदर्शनासाठी लागणा- या भक्तांच्या रांगा, मंगळागौरी पूजन, नागपंचमीचे झूले, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी,सणांची रेलचेल असलेला हा उत्सवी श्रावण!
श्रावण महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे बरं कां! श्रावणातल्या प्रत्येक वारांची एक कहाणी आहे,कथा आहे. कहाणी हा लोकवांग्मयाचा प्रकार! लोककथा! धार्मिक भावनांवर आधारित,पण सामाजिक आशय असलेली कथा.सचित्र कहाण्या या पुस्तकात या कहाण्या वाचायला मिळतात. लहानपणी आई आवर्जून वाचायला लावायची या कथा!
सोमवारची खुलभर दूधाची, मंगळवारी मंगळागौरीची,बुधबृहस्पतीवारांची कहाणी,शुक्रवारी जीवतीची,संपत शनिवारची,नि रविवारी आदित्य राणूबाईची कहाणी. या सचित्र कहाण्या समाज प्रबोधन उत्तम प्रकारे करतात.
घरातील सर्वांना तृप्त करून,मगच महादेवाला दूध वहाणारी आजी, मंगळागौर पूजेचे महत्व ,होणारे सामाजिक अभिसरण,बुधबृहस्पतीच्या कहाणी तील संपन्न असूनही,अतिथीला भीक्षा न देणा- या राजाच्या सुना,शुक्रवारच्या कहाणीतील, गरीब बहिणीचे श्रीमंत झाल्यावर, अन्न स्वतः न खाता,दागिन्यांना भरविलेले अन्नाचे पक्वानांचे घास, संपत शनिवारच्या कहाणीतील,स्वतःकडे पुरेसे अन्न नसतांनाही,रोग्याला भाकरी खाऊ घालणारी गरीब ब्राह्मणाची सून,तर आदित्य राणूबाई कहाणीतील सूर्योपासना!या सगळ्या कहाण्या,कथा समाज प्रबोधन करणा-या आहेत.
आधी भुकेल्याला अन्न देऊन तृप्त करा मग भगवंताला द्या.माणसांतच देवत्व शोधा,भगवंत शोधा हा सोमवारच्या कहाणीतील आशय किती चांगला बोध देतो न! मंगळागौरी पूजन सर्व आप्त मित्रांनी एकत्र येऊन साजरा करा. आनंद द्या आनंद घ्या. बुधबृहस्पती कथेतील विचार अन्नदानाचे महत्व विशद करतो. संपत्ती किती हे पाहून माणसाने वागू नये , तर नातीगोती कुटुंब सांभाळावे.कुटुंब स्वस्थ तर समाज स्वस्थ! शुक्रवारच्या कहाणीला संदेश किती छान आहे नाही! आपल्याजवळ जे असेल ते वाटून खावे. त्यामुळे प्रेम,जिव्हाळा वाढतोहेच तर संपत शनिवारची कहाणी सांगते. सूर्य हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. सूर्योपासना कराल तर बलसंपन्न व्हाल. माणूस शक्ती संपन्न तर समाज ,देश शक्ती संपन्न होईल हेच आदित्य राणूबाईची कहाणी सुचविते.
या सगळ्या कहाण्या वाचून ऐकून माणूस धार्मिक,आर्थिक, सामाजिक भान”त्या” काळात शिकला.
छोट्या छोट्या कथांतून समाज बलशाली होण्यास मदत झाली. कहाणीच्या शेवटी,उतणार नाही, मातणार नाही ,घेतला वसा टाकणार नाही असाही एक संदेश दिला जातो. कितीही अडचणी आल्या,संघर्ष करावा लागला तरी ध्येय पूर्णत्वास नेले पाहिजे ही एक शिकवण मिळते..
आजच्या काळात ही या कहाण्यांचा संदेश लागू पडतो. समाजभान जपणा-या,एकीचा संदेश देणा-या , व्यक्ती, समाज राष्ट्र बलशाली होण्यास मदत करणा- या या कथा आजही तितक्याच आवश्यक आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व संगोपनाचा वसा आपण सर्वांनी घेऊ या. शुद्ध हवा, मोकळा श्वास घेण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष लागवड नि स्वच्छता अभियानात आपण सहभागी होऊ या. आपले घर,परिसर गांव स्वच्छ ठेऊन एक पाऊल निरामय आरोग्यमयी जीवनाच्या दिशेने उचलू या. वृक्षलागवडीने पर्यावरणाचा तोल सांभाळू या. नि हो, उतणार नाही मातणार नाही ,हा घेतला वसा टाकणार नाही असा दृढनिश्चय करून हे अभियान यशस्वी करू या.
श्रावणा सारखाच बहरलेला, सुजलाम सुफलाम,निरोगी,आनंदी उद्योगी असा आपला देश बनवून ही सांठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपन्न करू या.

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर
२१\८\२२.

प्रतिक्रिया व्यक्त करा