You are currently viewing ई स्टोर इंडिया कंपनीबाबत जिल्‍हावासीयांत संभ्रम – परशुराम उपरकर

ई स्टोर इंडिया कंपनीबाबत जिल्‍हावासीयांत संभ्रम – परशुराम उपरकर

ग्राहकांना माल पुरवठा नाही, व्यवहार चेक ऐवजी रोखीने…

कणकवली

देशभराच्या अनेक भागातील ई स्टोर इंडिया कंपनीची दुकाने बंद होऊ लागली आहेत. सिंधदुर्गातील दुकानांमध्ये तर माल उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे ई स्टोरच्या ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सिंधुदुर्गातील अनेकांनी ई स्टोर कंपनीत गुंतवणूक केली असून या ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्‍यता मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज व्यक्‍त केली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्गात ई – स्टोर कंपनीच्या शाखा स्थापन झाल्‍या, त्यावेळी काही ग्राहकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी जनतेला आम्ही सावध केलं होतं. मनसेने तेव्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तसेच वस्तू सेवा कर भवन कोल्हापूर येथेही तक्रार पाठवली होती. मात्र या कंपनीवर तेव्हा कारवाई झाली नव्हती. मात्र आता या कंपनीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.
उपरकर म्‍हणाले, ई स्टोर कंपनीच्या दुकानांमध्ये घाऊक प्रमाणात मिळणारे सामान आता किरकोळ प्रमाणावर दिले जाते. व्यवहार चेकने न होता रोखीने होतात. कारण कंपनीकडे गुंतवणूक नसल्याने त्यांना सामान खरेदी करणे परवडत नाही. जिल्ह्यातील अनेक ई स्टोरची दुकाने बंद केली जात आहेत. तर ई स्टोर चे जिल्ह्यातील प्रमुख ‘नॉट रीचेबल’ येत आहेत. ई स्टोर च्या प्रमुखाने मिळालेले पैसे परदेशात गुंतवणूक केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकजणांवर दिवाळखोरीत जाण्याची वेळ आली आहे. ऐन चतुर्थीच्या काळात ई स्टोर मधून मालच मिळत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसेचे शिष्टमंडळ लवकरच पोलीस अधीक्षकांना भेटून याबाबत केलेल्या तक्रारीची चौकशी करणार आहे आणि याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणार आहे, असे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा