*”रक्तदान हेच श्रेष्ठदान” असा संदेश देत तब्बल 108 वेळा रक्तदान करणारे सनी रेडकर काळाच्या पडद्याआड*
जिथे माणूस स्वार्थाने झपाटलेला आहे तिथेच रक्तदानासारखे पवित्र काम करून अनेक लोकांना जीवदान देणारे वेंगुर्ला उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील संतोष आप्पा रेडकर उर्फ सनी रेडकर (वय 48) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तब्बल 108 वेळा रक्तदान करून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उक्तीला एका उंचीवर नेत रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचविलेले सनी रेडकर आज अखेर परमेश्वराला प्रिय झाले.
अत्यंत दुर्मिळ असा व “ओ” निगेटिव्ह रक्तगट असलेले सनी रेडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे बनले होते. दुर्मिळ रक्तगट असल्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज भासत होती तेव्हा ते दत्त म्हणून मदतीसाठी उभे राहत होते. त्यांचे रक्तदानाचे कार्य हीच त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरी ओळख होती. सर्वांशी आपुलकीने व प्रेमाने वागणे असा त्यांचा अत्यंत प्रेमळ स्वभाव होता. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे ते सक्रिय सदस्य असल्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वेळा रक्तदान करून कित्येकांचे प्राण वाचविले होते. वेंगुर्ला येथे ज्या ज्या वेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर असायचे त्या त्यावेळी ते शिबिरामध्ये रक्तदान करून रक्तदानाचा आपला संकल्प पुढे नेत होते. रक्तदान करून अनेकांच्या प्राणांचे रक्षण करणारे सनी रेडकर यांचा विविध संस्थांनी सन्मानही केला होता.
रक्तदानासारखे महान कार्य करणारा असा हा अद्वितीय रक्तदाता आज काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण जिल्ह्याला नक्कीच सनी रेडकर यांची उणीव भासत राहील. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षात लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा सनी रेडकर परमेश्वराच्या दरबारातही आपले स्थान निर्माण करून गेला. सनी रेडकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.