You are currently viewing मनामनातला कृष्ण कन्हैया….

मनामनातला कृष्ण कन्हैया….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक, कवी श्री.दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललीतलेख*

*मनामनातला कृष्ण कन्हैया….*

हे कन्हैया….
तूच स्वयं पूर्णब्रह्म आहेस…!
केवळ नेत्रांनी दिसणारे रूप साकार नसतं… तर वाणी…रूप…गंध…स्पर्श…स्वाद…मन… मस्तिष्क अथवा आत्म्या द्वारे ज्याचा अनुभव करता येतं… ते साकार रूप होय…! आणि त्यालाच निराकार ब्रम्ह म्हटलं जातं…!

*जय जय राधा जय कुंज बिहारी*
*राधा माधव जय मुकुंद मुरारी*
मनामनात वास करत असताना कन्हैया जेव्हा जेव्हा तुझा जयजयकार होतो…तेव्हा तेव्हा कृष्णप्रिय सखी राधेचाही नामोच्चार आदरपूर्वक होतो… राधे विना कृष्ण… न होय प्रीत पुरी …मनमंदिरी वसे साक्षात श्रीकृष्ण हरि….!
कन्हैया…राधा म्हणजे प्रसन्न करणे…समृद्धी अन् यशस्वितेचं दुसरं नाव राधा…! तू आणि राधा म्हणजे श्रुंगार भक्तीचं प्रतीक… राधेय… ही गोपिका राधा तुझी कामिनी…रमणी आहे ना रे? तुझ्या आणि राधेच्या उत्कट प्रेमाचा आविष्कार म्हणजे “रासलीला….”. अर्धनारीनटेश्वर रुपात तुझं आणि राधेचं अद्वैत प्रतिबिंबित होतं… त्यातूनच प्रेम आणि भक्ती दोन्हीची महती दिसून येते. म्हणून तर तुझं राधेशी असलेलं नातं आजही पवित्र मानलं गेलं आहे… राधेला देवी म्हणून मंदिरी स्थान दिलं गेलंय…!
कस्तुरी आणि तिचा सुगंध कधीच एकमेकांपासून अलग होत नाही….अगदी तसंच… तुझं आणि राधेचं प्रेम होय…!
*यमुनेच्या तीरी कान्हा वाजवी बासरी….राधा होई रे बावरी…राधा होई बावरी…* कन्हैया तुझ्या विचारांत…तुझ्या प्रेमात अखंड बुडालेली तुझी प्रिय राधा तुझ्या बासरीचा मधुर स्वर ऐकताच वेडावते…त्या बासरीच्या मधुर ध्वनीच्या दिशेने वेगेवेगे धाव घेते… यमुनेच्या तीरी…हिरवाईने नटलेल्या, मोहरल्या, बहरलेल्या, कंदंब वृक्षाखाली… मोरपंखी मुकुट धारण करून बसलेल्या मुकुंदमुरारीला पाहून राधा बावरते…लज्जेने चुर चुर होते… मनातल्या मनात शहारते…चोरट्या नेत्र कटाक्षाने ती तुझ्याकडे पहाते… तू मात्र तिची छेड काढण्याकरिता कळूनही न कळाल्यासारखा मुरलीच्या सुरांनी तिला वेड लावतोस… आपल्या गालावर ओघळणाऱ्या कुंतलांच्या नाजूक बटांना अलगद बाजूला करत तुझ्याच आवडीच्या मोरपंखी निळ्या ओढणीशी चाळा करत तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून जाते….!
प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं…निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण…! जे तुझ्याप्रती राधेचं… राधिकेचं होतं…
खरंच रे कान्हा….
तुझा निळा सावळा वर्ण…तुझ्या चेहऱ्यावर उमलणारे निखळ हास्य राधेला आपलं सर्वस्व विसरून तुझ्याकडे खेचून घेऊन येतं…! *वृंदावनी कृष्णकन्हैया…सुमधुर वाजवी पावा…प्रितीत व्याकुळ राधा…घेई कान्हाकडे धावा…!*
राधा तुझ्यात एवढी गुंतून जाते की, तू तिच्या अगदी समीप येऊन बसल्यावरही तिला त्याचं भान नसतं…

तू तिला विचारतोस….
“अगं, मी तुझ्याच समीप आहे पण तू कोणाच्या विचारात गुंतलीस?”

राधा भानावर येते…तिचे गोरे गाल लाजेने गुलाब पाकळ्यांसम गुलाबी होतात…गालावरच्या लालीमध्ये गोड खळी फुलते…मान खाली घालून राधा तुझ्या मिठीत सामावते…तुझ्या गालावरची निळाई तिच्या गुलाबी गालांवर उमटते…राधा हळूहळू तुझ्यात सामावून जाते…तुझ्या मिठीत ती स्वर्गीय सुख अनुभवते…
खरंच रे कान्हा….
तुझ्या बाहुत जे सुख मिळतं ते संपूर्ण ब्रम्हांडात मिळत नसेल ना रे?
तू हळूच तिच्या बटांना छेडतोस… प्रेमवेडी राधा बावरते… लाजते… अन् तुझ्या बाहुपाशातून दूर होत…शरमेने तिचे अधर लालेलाल होतात…जणू डाळिंब फुटावं आणि त्याची लाली अधरांवर पसरावी…अगदी तशीच…!
अरे कान्हा…कुणीतरी म्हटलंय की,
खुद्द ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर येऊन राधा आणि तुझा गंधर्व विवाह केला होता…! पण राधा तर तुझ्यापेक्षा वयाने मोठी होती म्हणे…!
कदाचित राधा आणि तुझं प्रेम हे भौतिक प्रेम नसावे….तुझ्या बासरीतून निघणाऱ्या मंजुळ ध्वनींवर मोहित होऊन राधा तुझ्या समीप आली असावी…राधा हे मूर्तिमंत प्रेम आणि भक्ती, समर्पणाचे प्रतीक…म्हणून तुमचं प्रेम हे अध्यात्मिक प्रेम असावे…!
देवाचे आपल्या भक्तांवर आणि भक्ताचे देवावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल…अगदी तेच प्रेम कृष्ण आणि राधेचे होय…! राधेच्या निस्सीम प्रेमामुळेच ती कृष्णाशी अद्वैत पावली होती. राधेला कृष्ण भक्तीचा ध्यास होता म्हणून ती हृदयाने, आत्म्याने आणि सर्वार्थाने कृष्णरूपात एकरूप झाली होती.
*राधे संग नाते प्रीतीचे…राधाकृष्ण म्हणती जन..*
*मीरा प्रतीक भक्तीचे… मीरा, कृष्ण भक्तीत लीन…*
कन्हैया…केशवा…गोविंदा…वासुदेवा..मुरलीमोहना…तुझ्या ओढीने राधा द्वारकेत आली…तुझे विवाह रुक्मिणी…सत्यभामेशी झाल्यानंतरही ना राधेचे तुझ्यावरील प्रेम कमी झालं ना राधा कधी कष्टी दुःखी झाली…
का रे?
राधेच्या तुझ्यावरील प्रेमात एवढी ताकद होती?
तुझ्या महालात ती तुझी सेविका म्हणूनही राहिली…
कारण तिला हवा होता तो केवळ तुझ्या बासरीचा नाद अन् तुझा प्रेमळ सहवास…!
*राधा भेटे कृष्णा…लोभ नसे मनी..*
*सान्निध्य कृष्णाचं…भासे शेवटच्या क्षणी…*
पण तुझा सहवास कमीच भेटत असल्याने ती महालातून बाहेर पडली…एकांकि जीवन कंठू लागली…
अखेरची इच्छा म्हणून राधेचे तुला आपल्या प्रेमाचे प्रतीक असलेली बासरी वाजविण्यास सांगितले..
कान्हा…तू तिची इच्छा पूर्ण केलीस…!
तुझ्या बासरीच्या संगीतात राधा भान हरपून गेली…
कन्हैया….हे मयुरेशा….
तू राधेसाठी दिवसरात्र बासरी वाजविली…
अन् ….
राधा देह त्यागून श्रीकृष्णात विलीन झाली….!
दुसऱ्याच क्षणात ….आपल्या प्राणप्रिय सखीच्या विरहात दुःख वेगाने तू तुझी बासरी सुद्धा मोडून तोडून टाकलीस…!
*प्राणप्रिय सखीचा… विरह कृष्णाला..*
*न होई तो सहन…तोडे बासुरीला..*
अन्…त्यानंतर तू कधीही बासरी वाजविली नाहीस….!
खरंच…
कन्हैया तुझं आणि राधेचं हे उत्कट प्रेम…प्रत्येकाला प्रेमाची परिभाषा शिकवून जातं….
केवळ गरज असते ती…
*प्रत्येकाच्या मनामनात कन्हैया तू सदैव बसण्याची….*

©【दीपि】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा