You are currently viewing संपूर्ण महाराष्ट्रातून जिविता पाटील यांना दिल्ली येथे भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ ने गौरविण्यात आले

संपूर्ण महाराष्ट्रातून जिविता पाटील यांना दिल्ली येथे भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ ने गौरविण्यात आले

 

रायगड(अलिबाग)/सचिन पाटील :

रायगड अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे – कातळपाडा गावातील सुकन्या तसेच नवीन वाघविरा येथील अंगणवाडी सेविका, समाजकार्यकर्ती, साहित्यिक पत्रकार जिविता सूरज पाटील यांना स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्ली येथे भारत सरकार तर्फे बेस्ट अंगणवाडी सेविका (सामाजिक कार्य) म्हणून भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ लोकसभा नेते मुकेश देसाई यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक,साहित्यिक, क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजसेविका जिविता पाटील कुसुंबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांच्यावर जिल्हाभरातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील तमाम अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व अंगणवाडी सेविकांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सरकारचे अनेकांनी आभार व्यक्त केले.
जिविता सूरज पाटील यांना वयाच्या २१ व्या वर्षी पदरात एक वर्षाचे मुल असताना वैधव्यपण आले तरी हिंमत न हारता शिक्षण सुरू ठेवले. वयाच्या अडचणींवर मात करीत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांचा भास आभास हा चारोळी संग्रह, काव्यकुंज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच त्यांचा अस्तित्व हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांनी एम.ए. बी.एड, एम.ए.एज्युकेशन, एम.एस.डब्ल्यू तसेच सध्या त्या ॲड.दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे एलएलबी च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. समाजकार्याची विशेष आवड जोपासत असताना समाजातील विधवा, परितक्त्या, कुमारी माता, निराधार, गरीब व गरजू महिलांसाठी तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन ची स्थापना केली. अनेक मुलींना खास करून आदिवासी मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले. जीवाची पर्वा न करता गरजवंतांना तसेच कोरोनाग्रस्तांना सेवा पुरविण्याचे इतकेच नव्हे तर ५४ कोरोना ग्रस्त लोकांना स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना वेळप्रसंगी स्वत:चे दागिने गहाण टाकून मोफत जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम जिवीता पाटील यांनी केले. आजपर्यंत अनेक मुली मुलांना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी स्वतः उचलला आहे. कुठेही गाजावाजा न करता जसं जमेल तसे कार्य करीत रहाणं हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.एक मानधनी अंगणवाडी सेविका कुठपर्यंत झेप घेवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिविता पाटील. हा पुरस्कार माझा एकटीचा नसून महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी सेविकांचा आहे त्यामुळे आज अमृत महोत्सवासनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील माझ्या सर्व अंगणवाडी कार्यकर्तीचा व समाजसेवकांचा सन्मान झाल्याचे समाधान आहे असे मत जिविता पाटील यांनी व्यक्त केले. तर त्यांनी त्यांना नेहमी साथ देणाऱ्या त्यांच्या सासू मनोरमा पाटील यांचे ऋण व्यक्त केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना मानाचा समजला जाणारा दिल्ली पार्लमेंट तर्फे भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ प्रदान करून दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथील आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. ही बातमी कळताच कुसुंबळे या त्यांच्या जन्मगावी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, सरपंच मीना लोभी, उपसरपंच रसिका केणी, जीवन पाटील यांच्या प्रयत्नातून कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत त्यांचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त हजारोंच्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या साक्षीने मोठा सत्कार करण्यात आला. आमदार महेंद्रशेठ दळवी तसेच मानसीताई दळवी यांनी सत्कार केला. तर जिल्हा परिषद अलिबाग, कोएसो.ना.ना पाटील.हायस्कूल पेझारी तसेच जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांच्या झेप फाऊंडेशन तर्फे त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. तर पंचायत समिती अलिबाग, कैलास पिंगळे यांनी आगरी सामाजिक संस्था अलिबाग, सह्याद्री सामाजिक संस्था अलिबाग यांच्या मार्फत सत्कार केला, आयसीडीएस प्रकल्प चिखली विभाग, तेजस्विनी फाऊंडेशन अलिबाग, साहित्यसंपदा फाऊंडेशन पेण, कल्पवृक्ष फाऊंडेशन पेझारी, रिअल अकॅडमी अलिबाग, नवकलाकृती फाऊंडेशन, संपर्क बालग्राम बांधण, श्री समर्थ वृध्दाश्रम परहुरपाडा इ.अनेक सामाजिक संस्थांनी यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा