You are currently viewing माणूस आणि माणसाची वृत्ती..!

माणूस आणि माणसाची वृत्ती..!

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

सुख आणि दुःख या जीवनातील न चुकणाऱ्या गोष्टी आहेत. आयुष्यभर कुणीही सुखात लोळू शकत नाही किंवा दुःख भोगू शकत नाही. सुखाची प्रत्येकाची एक वेगळी परिभाषा असते, एक वेगळं प्रमाण असतं. क्षणभर सुख सुद्धा काहींना समाधान देऊन जातं, तर काहींना मणभर सुख सुद्धा पुरेसं नसतं. पण आयुष्य सुखात घालवणाऱ्या ना क्षणिक दुःख सुद्धा डोंगरएवढं वाटतं. कारण दुःखाशी सामना करण्याची त्यांची क्षमता नसते. म्हणून सुख आणि दुःख दोन्हीची माणसाच्या आयुष्यात गरज आहे. तरंच सुखाचं आणि दुःखाचं महत्व माणसाला समजून येईल.
माणूस हा खूप विचित्र प्राणी आहे. स्वतः दुःखात असताना तो सर्वांच्या जवळ असतो, त्याला प्रत्येकाच्या प्रेमाची, आपुलकीची गरज असते. पण सुखात लोळू लागला की त्याला जवळपास इतर कोणीही नको असतं. सुखाने तो वेडावून जातो. जी माणसं कधी प्रेमाची, आपुलकीची, जवळची असतात तिच दूरची वाटू लागतात. कधी कधी तर जे सुख आपल्याला मिळालंय ते हीच माणसं जी आपली म्हणतो ती ओरबाडून तर घेणार नाहीत ना? अशी त्याला भीतीही वाटू लागते. आपलं सुख, पैसा, प्रॉपर्टी आपल्यापासून ओरबाडून घेतील या भीतीपोटी मनात असलेलं दुसर्याबद्दलच प्रेम सुद्धा माणूस गाडून टाकतो आणि स्वतःला इतरांपासून तोडून विलग करतो. काहीवेळा अशीच वृत्ती माणसाला माणुसकी विसरल्याने एकलकोंडं जीवन जगण्यास मजबूर करते.
आपल्या माणसांशी असलेले प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे, चांगले संबंध एखाद्या क्षुल्लक कारणावरून तोडले जातात. त्यावेळी विचार केलेला नसतो, आपण कोणाला काय म्हणतो? आपण योग्य की अयोग्य बोलतोय? आपल्या बोलण्याने समोरच्याला किती दुःख होईल? आपलंच रक्तामासाचं माणूस आपल्या पासून दूर होईल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण रागाच्या, वेडाच्या भरात सहज वाईट बोलून गेलेलो असतो, परंतु त्यामुळे आपल्या रक्ताच्या नात्याच्या माणसाच्या हृदयात असलेली आपली जागा आपणांस पुन्हा मिळेल का? ती जवळीक, ते प्रेम, ती माया, ती भावुकता पुन्हा कधी निर्माण होईल का? नातं रक्ताचं असलं तरी रक्ताची ओढ पुन्हा लागेल का?
माणसाच्या एका चुकीमुळे कितीतरी अनुत्तरी प्रश्न निर्माण होतात. किंबहुना माणूस स्वतःच्याच वागणुकीमुळे ते प्रश्न निर्माण करतो. आणि स्वतःच प्रश्नांच्या जाळ्यात अडकून पडतो. चांगली प्रकृती असताना नाती जपली, फुलविली तर प्रकृती बिघडल्यावर नात्यात ओलावा शोधण्याची गरज भासत नाही. तर तो ओलावा आपोआप निर्माण होत असतो. सुशब्द आणि सुविचार कधीही मनं जपण्याचेच काम करतात. परंतु त्यासाठी मन स्वच्छ आणि साफ असले पाहिजे. मन गढूळ असेल, मनात वाईट विचार असतील तर मुखातून निघणारे शब्द हे वाईटच निघतात. माणसाचं मन हे विचारांचं वारूळ असतं, आत किडे आहेत, मुंग्या आहेत की साप? हे बाहेरून समजत नाही, परंतु एकदा का मनातील विचार फुटलेल्या वारुळासारखे बाहेर पडले की मनाची अवस्था समजून येते. माणसाच्या मुखातून निघणारे शब्दच त्याच्या मनातील गाभाऱ्याचं दर्शन घडवतात.
मनावर ताबा असला तरंच मुखातून सुविचार येतात आणि तेच सुविचार माणसाचे संबंध चांगले राखण्यास मदत करतात. माणसाची वृत्ती चांगली असेल तर माणूस कधीच नात्यांपासून दूर होत नाही, तर नात्यांच्या गोतावळ्यात सुखाचे क्षण अनुभवत राहतो. अन्यथा माणसाचे टोकाचे शब्द, टोकाची भूमिका माणसाला आपल्याच नात्यांच्या जवळ जाण्यात अडचण निर्माण करतात. त्यामुळे माणसाने तोंड आहे म्हणून उघडण्यापेक्षा गरज आहे तेव्हा, आणि गरज आहे तिथेच उघडणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणून फक्त माणूस म्हणून जगून उपयोग नाही, तर माणसाची चांगली वृत्ती आणि सदविचार हेच माणसाचं आयुष्य घडवू शकतात आणि नाती गोती जपू शकतात.

(दीपी)

प्रतिक्रिया व्यक्त करा