*”मेघनुश्री” या टोपण नावाने लिहिणाऱ्या कोल्हापूर येथील साहित्यिका लेखिका कवयित्री श्रीम. मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*जाण*
परवाच राखीपोर्णिमा (रक्षाबंधन) सण उत्साहांत साजरा केला गेला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, सदैव मनांत असणारी भावना कागदावर उमटली. सैनिक बांधव आणि त्यांचे आयुष्य, ते आणि त्यांचे कुटुंब करत असलेला त्याग आणि धाडस यांनी मन भरून येते. बऱ्याच वेळां आवड आणि काही वेळां घरची निकड समजून घेऊन सैन्यात प्रवेश केला जातो. देशाचे संरक्षण ही वैयक्तिक भावना अभिमानास्पद आहेच पण यांमुळे त्या लढवय्याच्या कुटुंबाचा आणि गावाचाही मान वाढतो. म्हणूनच स्वातंत्र्यदिनादिवशीच केवळ सैनिक बांधवांचे स्मरण व्हावे असे नाही तर त्यांच्या पराक्रमाची रात्रंदिवस जाण असायला हवी. चित्रपटांमधून या विषयावर अनेकदा प्रकाशझोत टाकला गेला, पण जे कुतुहल मनांत आहे त्याची उत्तरे काही प्रमाणांत मिळवून लेखनाद्वारे सामोरे आणण्याचा विचार केला.
संवाद साधताच माहिती मिळाली, सैनिकी जीवनाचे विविध पैलू समजून आले. घरांतील सण समारंभ असो किंवा कोणाचाही वाढदिवस, ध्येयासाठी मागे सोडून पुढे वाटचाल करावी लागते. एकदम बर्फाळ प्रदेश किंवा सागर -किनाऱ्यावरील वास्तव्य या रहाणीमानाशी जुळवून घ्यावेच लागते. दर तीन वर्षांनी होणारी बदली हा तर अविभाज्य भाग. काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीत कुटुंबाला घेऊन तंबूतही संसार मांडावा लागतो. आला दिवस आपला हा दृष्टिकोन असला तरीही डोक्यावर कायमची टांगती तलवार असा हा जीवनसंग्राम, महिनोंमहिने पती-पत्नीची भेट नाही होऊ शकत. ज्या क्षणी सैन्यात परतण्याचा संदेश मिळतो तिथे प्रत्येक वेळी कसोटीचा क्षण असतो. अशावेळी नुकतेच लग्न झालेले असूनही, वैवाहिक जोडीदाराला समजूतदारपणा दाखवावा लागतो. पुढे पालक म्हणून एकट्याने घरची, जबाबदारी पार पाडावी लागते. अनाहूतपणे अघटीत संकटाला तोंड द्यावे लागते. शत्रूचा पराभव करताना धारातिर्थी पडणाऱ्या जवानाचं शौर्य कुटुंबासाठी अविस्मरणीय असते. जी व्यक्ती कौटुंबिक आघाडी सांभाळते तिला कार्यरत रहाता येत नाही.
या बदलीव्यवस्थेमुळे वेगवेगळे प्रांत आणि शहरे पहाता येतात अशा काही सकारात्मक बाजूही आहेत. स्वतंत्रपणे जीवनानुभव घेता येतात. कर्तव्यासोबत विरंगुळ्याचे क्षणही सापडतात. मुख्य मणजे प्रत्येकाचा या सगळ्याकडे पहाण्याचा विचार वेगळा असतो. आज संपर्क साधने वाढली आहेत, पण पूर्वी घरांतील आनंदाच्या, दु:खाच्या वार्ता समजायलाही बराच कालावधी जात असे. आजही अनेक तरुण सैन्यात दाखल होत असतात. याचा अभिमान मात्र सदैव, मातेच्या भरल्या डोळ्यात तरळत राहतो. भारतमातेसाठी प्रांतातील विविधता जपत, ध्येयपूर्तीसाठी अखंड, अविरत लढा देणाऱ्या शुरांना मनापासून वंदन. “सैनिक बांधवांना बळ, सामर्थ्य लाभू दे” हीच भारतमातेचरणी प्रार्थना. सासरकडून मागच्या पिढीतील सैनिकी परंपरा असणारे, देशसेवा करणारे लेफ्टनंट कर्नल (गुरखा रायफल्स), मेजर (सॅपर्स-अंटार्टिका मोहीम) आणि कमांडो अशा कर्तुत्ववान व्यक्तिंसाठी लेखन करता आले हे माझे भाग्यच आहे.
“जय हिंद”
मेघनुश्री, कोल्हापूर
मोबाईल : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com