You are currently viewing नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे लिखित नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने लिहिलेला लेख*

*नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन*

रिमझिम बरसणाऱ्या श्रावण धारा, नव वधू समान नटलेली
हिरवीगार वसुंधरा, नि ऊन- सावलीचा लपंडाव खेळणारा श्रावणातला पाऊस! अहा! किती सुंदर हा श्रावण मास! त्यात
श्रावण महिना हा आपला व्रत वैकल्यांचा महिना. श्रावणी सोमवार, श्रावणी गुरूवार, श्रावणी शनिवार, पूजाअर्चा असे महिनाभर धार्मिक कार्ये आपण करत असतो. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतो. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळी समाजाची प्रथा आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ, म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.

*श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्रथा*

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म पाळणाऱ्या बऱ्याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरुषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते. या विधीला श्रावणी म्हणतात. गोव्यामध्ये ह्याला ‘सुतापूनव’ असे म्हणतात. घरातील सर्व पुरूष मंडळी जानव्याची (धाग्याची) पूजा अर्चा करून गळ्यात जानवे घालतात व नारळी भाताचा नैवेद्य दाखवतात.
ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते.
बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा हा सण वेगळ्या कारणासाठी महत्त्वाचा आहे. जानवी बदलण्यासाठी श्रावणी पौर्णिमेखेरीज व्यक्तीच्या पोटजातीनुसार अन्य काही दिवसही सांगितले गेले आहेत. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचा पहिला दिवस किंवा ज्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या समावर्तन संस्काराचा दिवस म्हणून श्रावण पौर्णिमा महत्त्वाची मानली जाते असे.
एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. तैत्तरीय हिरण्यकेशी श्रावणी दुसऱ्या पौर्णिमेला असते.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो. या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोक वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव त्याकाळी साजरे करत होते. तर शिक्षण घेण्यासाठी सुरूवात करण्यासाठी हा शुभमुहूर्त काढण्यात येत असे. अध्ययनासाठी आरंभ, शौर्याचे प्रतीक म्हणजे श्रावणी असा अर्थ होतो. हे देखील या सणाचे धार्मिक महत्त्व आहे.

रक्षाबंधनचं धार्मिक महत्त्व
राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे.
इतिहासातील एक कथा, चित्तोडची राणी कर्णावती शेरखानच्या वेढ्यात अडकली होती. राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवून रक्षण करण्यास सांगितले होते. हुमायूनने भाऊ म्हणून राणीचे शत्रूपासून रक्षण केले होते. ह्या वरून रक्षा बंधन या सणात भावाबहिणीचे नाते हे पवित्र मानले जाते. ह्या नात्यात जाती धर्माची आडकाठी नसते.
तसेच कोणत्याही धाडसी, शूरवीर अशा पुरूषाने आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे, दुर्बल, वृद्ध, आबाल, अपंगांचे रक्षण करणे हा धर्म समजण्यात येतो. पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला भटजी अर्थात पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद हे पवित्र मानण्यात येतात. या रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्वदेखील आहे. मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे. त्याकाळी अनेकवेळा परप्रांतीयांचे आक्रमण होत असे. त्यामुळे रक्षणकर्त्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या या पवित्र संस्कृतीला तेव्हापासून धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तरी भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.

*रक्षाबंधनाच्या परंपरेबद्दल काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्या जाणून घेऊया:-*
एक अशी आख्यायिका आहे की, देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते.

*दुसरी कथा* म्हणजे बळी नावाचा राजा अश्र्वमेध यज्ञ करत होता. त्याक्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळी राजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे ठाकले. त्यांनी बळी राजाला तीन पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळी राजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रुपी विष्णूंना जमिनीवर तीन पावलं ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली. दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळी राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले.
बळी राजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूंकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की, मला असा आशीर्वाद घ्या की, इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळी राजासोबत पाताळात राहणे पसंत केले.
देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली. त्यावेळी नारदमुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला.
विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला, त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळी राजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले? त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळी राजाने त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले. त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठविण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण- भावाचे नाते जपणारा असा हा सण मानला जातो.
मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला आहे.

रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचे स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर, म्हणजेच राख – सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे. त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे.

आपण अनेकदा पाहतो की, बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते, ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कर्तृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी आपल्यावर आहे अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. राष्ट्रीय सेवक संघाचे स्वंसेवकही एकमेकांना रक्षा बंधनाचा धागा बांधून देश बांधवांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतात.
रक्षाबंधनाची पद्धत सहसा ही उत्तर भारतामध्ये दिसून येते. आता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा-बहिणीच्या या प्रेमाच्या ‘रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व कायम आहे.
नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.🌹🌹

शोभा वागळे
मुंबई
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा