कणकवली :
कणकवली एसटी आगारातून संध्याकाळी ५.१५ वाजता सुटणारी मालवण एसटी आगाराची कणकवली मसुरे डांगमोडे ही वस्तीची फेरी गेले कित्येक महिने बंद केल्यामुळे येथील विद्यार्थी वर्गासहित व्यापारी ज्येष्ठ ग्रामस्थ आणि सर्व प्रवासी वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ही बस फेरी येत्या चार दिवसात सुरू न केल्यास मसुरे बाजारपेठ येथे आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे.
गेली कित्येक वर्ष मालवण आगारात ची कणकवली मसुरे डागमोडे ही एसटी बस फेरी संध्याकाळी सव्वा पाच वाजता कणकवली एसटी आगारातून सुटून डागमोडे येथे वस्तीला येते होती. पुन्हा हीच एसटी सकाळी सात वाजता डांगमोडे मसुरे कणकवली अशी परत जात होती. परंतु एसटी प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक ही बस बंद केल्याने येथील एसटी प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. डागमोडे या भागातून संध्याकाळी एकही बस नसल्यामुळे पाच ते सहा किलोमीटर येथील ग्रामस्थांना रात्र प्रसंगी पायी प्रवास करावा लागत आहे. येथील लहान-मोठे व्यापारी महिला ग्रामस्थ सकाळी याच एसटीने डाँगमोडे ते मसुरे बाजाराला येत असतात आणि छोटा छोटा व्यापार करत असतात.आता ही फेरी नसल्यामुळे या सर्वांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच सकाळी शालेय विद्यार्थी कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. एसटी प्रशासनाने ही फेरी त्वरित चालू करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मसुरे माजी सरपंच तथा भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष लक्ष्मी पेडणेकर यांनी एस टी प्रशासनाला दिला आहे.