कणकवली
कणकवली शहरात जानवली नदीकाठच्या गणपतीसाणा येथे कृत्रिम धबधब्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने हे काम अडवून ठेवले होते. आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणाऱ्या पहिल्याच जिल्हा नियोजन सभेत धबधब्याचे काम अग्रक्रमाने मंजूर होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
नगरपंचायत सभेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचे नियोजन, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, छत्रपती शिवाजी महाराज स्थलांतरण आदी प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. कणकवली नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी समीर नलावडे होते. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह ॲड.विराज भोसले, अभिजित मुसळे, अबिद नाईक, बाबू गायकवाड, मेघा गांगण, उर्मी जाधव, कविता राणे, प्रतीक्षा सावंत आदी नगरसेवक उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने जानवली नदीकाठी मोठा कृत्रिम धबधबा साकारला जाणार आहे. गतवर्षी या धबधब्याच्या कामाचा आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीही या कामाला मंजूरी दिली होती. मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील काही पदाधिकाऱ्यांनी या धबधब्याचे काम अडवले होते. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच कणकवली शहरातील धबधब्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतीच्या सलग आठ बैठकांना मुख्याधिकारी उपस्थित राहिलेले नाहीत याबाबत कन्हैया पारकर यांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी मुख्याधिकारी नसले तरी विकासकामे थांबलेली नाहीत असा मुद्दा मांडला. तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी येत्या आठ दिवसांत आपापल्या प्रभागातील विकासकामांची यादी सर्व नगरसेवकांनी आमच्याकडे द्यावी. मंत्रिमंडळ विस्तार होताच या सर्व विकासकामांना मंजूरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
नगरपंचायत सभेत हर घर तिरंगाचे नियोजन नगराध्यक्षांनी सादर केले. यात कणकवली कॉलेज पटांगण ते शहरातून भव्य प्रभात फेरी निघणार आहे. प्रत्येक घरांमध्ये नगरपंचायतीच्यावतीने मोफत झेंडे दिले जाणार आहेत. त्यासाठी कणकवली कॉलेज, विद्यामंदिर हायस्कूल आणि एस.एम. हायस्कूलचे स्वयंसेवक तसेच नगरपंचायत यांची पथके तयार ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कणकवली शहरात यंदा चौंडेश्वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर, टेंबवाडी, तेलीआळी या भागात नवीन रस्त्यांची कामे मार्गी लागली. त्या सर्व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान यंदा डांबरीकरण कामांना उशिरा मंजूरी मिळाली. त्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे सर्व निविदा कामांना मुदत वाढ देण्याचाही ठराव नगरपंचायत सभेत घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब नादुरूस्त झाला आहे. त्यामुळे ८० लाख रूपये खर्च करून अत्याधुनिक नवा अग्निशमन बंब खरेदी करण्याचाही ठराव सभागृहात घेण्यात आला. तर नगरवाचनालय ग्रंथालयासाठी नगरपंचायतीला अनुदान मंजूर झाल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
बॅनर लावताना काळजी घ्या
शहरात विविध राजकीय पक्षांच्यावतीने बॅनर लावले जातात. यात सध्या शिवसेनेतील मूळ पक्ष आणि शिंदे गट यांच्यातील कार्यकर्त्यांकडून तक्रारी होत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीला विना परवाना लावलेल्या बॅनरवर तातडीने कारवाई करावी लागत आहे. यात राजकीय वातावरणही विनाकारण तापत आहे. त्यामुळे बॅनर लावताना तक्रारी होणार नाहीत याची काळजी सर्व नगरसेवकांनी घ्यावी असे निर्देश नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिले.
तिरंगा मागे घेतला जाणार नाही
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने शहरातील सर्व ७ हजार ७६५ घरांमध्ये मोफत तिरंगा वितरण होणार आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरांवर हा तिरंगा फडकणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्येक नागरिकाने तिरंगा घरातच सुरक्षित ठेवावा. तिरंगा नगरपंचायतीकडून पुन्हा मागे घेतला जाणार नाही अशी माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिली.