‘रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा’ या तीनही वाहिन्या ब्लॅकलिस्टमध्ये
मुंबई :
मुंबई पोलिसांकडून ‘टीआरपी’ मध्ये फेरफार करणाऱ्या टेलिव्हिजन वाहिन्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनी सोबतच ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनी देखील तीनही वाहिन्यांसंबधी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, या तीन वाहिन्यांना जाहिरातींसाठी ब्लॅकलिस्ट म्हणजेच काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी त्या वाहिन्यांची नावं घेणं टाळलं आहे.
टीआरपी रॅकेट मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. हे रॅकेट टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवले जात होते. पैसे देऊन रेटिंग वाढवण्यात आल्याचे यात समोर आले आहे. टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी ‘हंसा’ ही एजन्सी या चॅनेल्सना मदत करत होती. बजाज यांनी हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर या तीनही वाहिन्यांवर बंदी घातली आहे.
बजाज यांनी ‘सशक्त ब्रँड हा एक पाया आहे, ज्यावर आपण मजबूत व्यवसाय बनवतो. आमची कंपनी कोणत्याही द्वेषबुद्धीला आणि समाजात विष पसरवणाऱ्या मानसिकतेला मान्यता देत नसल्याचं,’ स्पष्ट केलं आहे. ‘आम्ही द्वेषबुद्धीनं काम करणाऱ्या वृर्तमानपत्र आणि वाहिन्यांची नावं काढत आहोत. यामुळे व्यवसायावर त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम झाला तरी आम्ही त्या माध्यमांचं समर्थन करणार नसल्याचंही,’ त्यांनी नमूद केलं आहे.
टीआरपी म्हणजे नक्की काय असते, त्याचे मोजमाप नक्की कसे केले जाते, याविषयी सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू असते. टीआरपीच्या एका पॉईंटवर जाहिराविश्वात मोठे बदल घडू शकतात. याच टीआरपी रेटिंगवर टेलिव्हिजन वाहिन्यांना जाहिराती मिळतात. त्यामुळे टीआरपीचे आकडे हे वाहिन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ब्रॉडकॉस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया (बार्क) ही संस्था आपल्या व्यापक, देशव्यापी यंत्रणेव्दारे ‘टीआरपी’ ची आकडेवारी गोळा करते. ज्यांना ही आकडेवारी हवी असते त्या व्यक्ती अथवा संस्थेला बार्कतर्फे वार्षिक शुल्क आकारले जाते. दर गुरुवारी त्या-त्या आठवड्याची आकडेवारी जाहीर होते.