You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच पुणे विभागाचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न.

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच पुणे विभागाचे स्नेहसंमेलन थाटात संपन्न.

अध्यक्षपदी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र साहित्य परिषद, कार्यवाह श्री.न.म.जोशी यांची खास उपस्थिती

साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या पुणे विभागाचे स्नेहसंमेलन पुणे येथे रविवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी पार पडले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी २०२१ चा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह तथा कोषाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, प्रसिद्ध साहित्यिक श्री.न. म. जोशी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे नियोजन ज्येष्ठ कवी/लेखक श्री.अरविंद ढवळीकर व लेखिका/कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांनी केले होते, तर स्वागताध्यक्ष पदी ऋतुपर्ण मासिकाचे संपादक श्री.सुरेंद्र गोगटे होते.
पुणे येथे पार पडलेल्या स्नेहमेळाव्यात जमलेल्या सर्व साकव्य सदस्यांनी मनापासून आनंद घेतला. सर्वांनी आपल्या काव्यरचना सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थितांनीही सर्वांना भरभरून दाद दिल्याने कार्यक्रम शेवटपर्यंत खुलत गेला. साकव्य अध्यक्ष आदरणीय श्री.पांडुरंग कुलकर्णी यांनी देखील सुंदर कविता सादर केली. सर्वांनी आपल्या कवितांचे सादरीकरण तर केलेच परंतु शेवटपर्यंत थांबून सर्वांना दाद दिली हे विशेष. आदरणीय श्री.न. म. जोशी सरांना ऐकणे हे देखील भाग्यच, त्यातून खूप काही शिकता येते, त्यांच्या समोर सादरीकरण करायला मिळाल्याने व त्यांच्या हस्ते बक्षित घेतल्याने खूप आनंद झाल्याचे कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांनी सांगितले. श्री. न. म. जोशी यांच्या बाबत बोलताना त्यांना मिळालेला पुरस्कार व त्याची प्रकाशित झालेली ५५ पुस्तके याबद्दल माहीत देत श्री.अरविंद ढवळीकर यांनी अध्यक्ष म्हणून मनोगत व अनुभव कथन सुंदर झाले असे नमूद केले. स्वागताध्यक्ष श्री.गोगटे यांनी मेळाव्या कामी खूप परिश्रम घेतले व अल्पोपहाराची व्यवस्था केल्याने श्री.ढवळीकर यांनी त्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे स्वतःच्या घरातील लग्न कार्य असल्याप्रमाणे वावरलेल्या सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचेही कौतुक केले. मेळाव्याचे अध्यक्ष श्री.न. म. जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात सुंदर मनोगत व्यक्त करून साहित्यिक अनुभव कथन केले.
कार्यक्रम अगदी नैसर्गिक, वेळेत आणि आनंदी वातावरणात पार पडला. प्रत्येकाच्या देहबोलीतून व चेहऱ्यावरून सर्वजण खुश असल्याचे जाणवत होते. अरविंद ढवळीकर, ज्योत्स्ना तानवडे व गोगटे साहेबांनी प्रत्येक गोष्ट मनापासून केल्याचे कार्यक्रमाच्या यशस्वितेवरून दिसत होते. श्री.विलास कुलकर्णी,श्री.चिदानंद फाळके, सौ.निलांबरी गानू यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नाही, परंतु त्यांच्या सदिच्छा पोचल्या. एकंदरीत पुणे विभागाने बाजी मारल्याचे आजच्या मेळाव्यावरून दिसून आले. श्री.पांडुरंग कुलकर्णी मुंबई, तर श्री.शुक्लजी नाशिकहून खास मेळाव्यासाठी उपस्थित होते.
काल पार पडलेल्या स्नेहसंमेलनास उपस्थित पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि मेळावा यशस्वी केला. दिवाळी अंकाची मीटिंग सुद्धा फलदायी ठरली. प्रत्येक महिन्याला सर्व पुणेकर सदस्यांनी एकत्र येऊन मासिक कविकट्टा, विविध गुणदर्शन कार्यक्रम, उपक्रम करावेत अशी अपेक्षा साकव्य प्रमुख पांडुरंग कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या यशस्वी स्नेहमेळाव्यामुळे पुढील स्नेहसंमेलनाची उत्सुकता मात्र वाढली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा