You are currently viewing बी….मैत्रीचं

बी….मैत्रीचं

*”जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच”…. “लालित्य नक्षत्रवेल” समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन- रायबागकर लिखित अप्रतिम लेख*

*बी….मैत्रीचं*

काही वर्षांपूर्वी एक बी पेरलं होतं…
बी रुजलं,अंकुरलं, हळूहळू रोपटं वाढू लागलं…
हास्यविनोदाच्या, समानभूतीच्या खत पाण्याने दिसामाशी त्याला बाळसं धरलं चांगलं…
पालवी फुटली, कळ्या, फुलंही डोकवायला लागली पानांआडुन…
परक्या भूमीत रुजलेलं, वाढलेलं ते झाड सगळ्यांच्या कौतुकाचा विषय झालं…
हळूहळू त्या झाडांवर पक्षांनी आसरा घ्यायला सुरुवात केली…
आधी एक, दोन आणि मग…कितीतरी…रोज सकाळ संध्याकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानं ते झाड आनंदून जाई…
असेच काही दिवस गेले…
आणि मग एका घोर संकटाची छाया सगळीकडे पसरली…
पक्षी बावरले, घाबरले…
आणि मग एकेक पक्षी उडून गेले, दुसऱ्या झाडांवर आसरा घ्यायला…
झाड हिरमुसलं, उदासलं…
पक्ष्यांच्या किलबिलिटाशिवाय त्याला चैन पडेना…
पण एक-दोन पक्ष्यांनी त्या झाडांची फांदी धरून ठेवली घट्ट…
झाडाला तेवढाच दिलासा…
हळूहळू संकट पूर्णपणे टळलं नाही तरी त्याची तीव्रता कमी झाली…
पक्ष्यांना आशा होती…नव्हे विश्वासच…
आशेवर तर जीवन चालतं…
जुन्यांना सोडून जावं लागलं तरी पुन्हा नवीन पक्षी नक्कीच येतील…
अशाच एका झाडाच्या शोधात…
आणि झाडाचा विश्वास खरा ठरला…
हळूहळू पक्षी येत गेले…
झाडावरचा किलबिलाट पुन्हा वाढू लागला…
झाड पुन्हा बहरू लागलं, फांद्या हलवून डोलू लागलं…
आता झाडाला माहिती आहे…
यातील काही पक्षी पुन्हा उडून जातील…
काही पुन्हा परत येतील…
काही नाहीच येणार…
पण झाडानं आता वास्तव स्वीकारलंय…
सारे प्रवासी घडीचे…
त्यामुळे झाड आनंदी आहे…आणि आनंदानं डोलतच राहील…
कारण ते बी होतं निरपेक्ष नात्याचं…
सदाबहार मैत्रीचं…!

मैत्री दिनानिमित्त…
माझ्या सर्व सदाबहार सख्यांना…समर्पित

भारती महाजन-रायबागकर
*चेन्नई*
9763204334
७-८-२२

प्रतिक्रिया व्यक्त करा