कणकवली नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमाचे नियोजन
कणकवली शहरात 7 हजार 565 तिरंगा झेंड्याचे पथकांमार्फत होणार वितरण
कणकवली:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत कडून शहरातील सर्व घरांमध्ये तिरंगा झेंडा देण्याच्या अनुषंगाने आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. कणकवली शहरातील 17 प्रभागांमध्ये तिरंगा झेंडा वाटप करण्याकरिता नियोजन करण्यात आले. तसेच हा तिरंगा झेंडा प्रभागांमधील घरांमध्ये वाटप करण्याकरिता आवश्यक असलेले 7 हजार 565 झेंडे व त्यासाठीच्या काठ्या देखील लवकरच सज्ज ठेवण्यात येणार आहेत. कणकवली नगरपंचायत शहरातील नागरिकांना मोफत झेंडे पुरवठा करणार आहे अशी माहिती देखील या बैठकीत श्री नलावडे यांनी दिली. प्रत्येक प्रभागांमध्ये महाविद्यालय, हायस्कूल चे विद्यार्थी व त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी असे पथक नियुक्त करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचे वितरण केले जाणार आहे असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
हर घर तिरंगा झेंडा व स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत आज कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले, माजी नगरसेवक बंडू गांगण, प्रा. सुरेश पाटील, रविराज प्रधान, अच्युतराव वनवे, रसिका शेट्ये, सायली गुरव, वर्षा करंबेळकर, कल्पना मलये, अरविंद गवळी, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे, रुचिता ताम्हणकर, ध्वजा उचले आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कणकवली कॉलेज चे एनसीसी व एनएसएस चे मिळून136 तर एस एम हायस्कूल व विद्यामंदिर हायस्कूल यांची प्रत्येकी 34 असे मिळून एकूण 204 विद्यार्थी – विद्यार्थिनी या उपक्रमांतर्गत कणकवली शहरात प्रत्येक घरात तिरंगा झेंड्याचे वितरण करणार आहेत. त्या अनुषंगाने या बैठकीत नियोजन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहेत. 17 प्रभागांमध्ये पथकांच्या माध्यमातून घरोघरी झेंड्याचे वितरण केले जाईल असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. कणकवली शहरात 7565 झेंड्यांची मागणी करण्यात आली आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे 11 व 12 ऑगस्ट रोजी कणकवली शहरात तिरंगा झेंड्याचे वितरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या. प्रत्येक प्रभागात 12 विद्यार्थी व त्यांच्यासोबत नगरपंचायत कर्मचारी अशा प्रकारे ही पथकांची रचना असणार आहे. कणकवली कॉलेजच्या वतीने सोमवारी कणकवली शहरातून हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. तर कणकवली शहरातील प्रत्येक अंगणवाडी असलेल्या भागांमध्ये अंगणवाडीमार्फतही जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.