नेव्ही, कोस्टगार्ड, महाराष्ट्र पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग व ओएनजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
आमदार वैभव नाईक व मच्छिमारांनी मांडल्या समस्या
मालवण :
मालवण तालुक्यातील दांडी येथील फिशरीज ट्रेनिंग सेंटर येथे आज मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सामुदायिक संपर्क कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नेव्ही, कोस्टगार्ड, महाराष्ट्र पोलिस, मत्स्यव्यवसाय विभाग व ओएनजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून पारंपारिक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी उपस्थित मच्छिमारांनी देखील आपल्या व्यथा मांडत परप्रांतीय,पर्सनेट व एलईडी मच्छिमारीद्वारे होत असलेली अनधिकृत मच्छिमारी रोखण्याची मागणी केली.
मच्छिमारांना या कार्यक्रमातून सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी, नौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रे, देशाच्या सागरी सुरक्षेबाबत मच्छिमारांनी घ्यावयाची काळजी व समुद्रात संशयास्पद हालचाली आढळून आल्यास अलर्ट राहून सुरक्षा यंत्रणाना द्यावयाची माहिती याबाबत कोस्टगार्ड व नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला नौदलाचे लेफ्टनंट एम्.विनयकुमार, कोस्टगार्ड अधिकारी आर.बी.बनकर, नौदलाचे अधिकारी राधेशाम यादव,मनबीर सिंह, बंदर अधिकारी एस्.पी.आवळे,ए. पी.आय सचिन चव्हाण, फिशरीजचे मुरारी भालेकर, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, महेंद्र पराडकर, सन्मेश परब, दिलीप घारे,भाऊ मोर्जे आदींसह मच्छिमारी संस्थाचे प्रतिनिधी, मच्छिमार उपस्थित होते.