सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; कातडीसह साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त…
बिबट्यासह अन्य एका प्राण्याच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी तळेरे येथे देवगड येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. श्रावण लक्ष्मण माणगावकर, रा. तळेरे व राजेंद्र पंढरीनाथ पारकर रा. वळीवंडे, अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून आज दुपारी बारा वाजता देवगड एसटी स्टँड समोर करण्यात आली. यात साड तीन लाखाच्या कातडयासह दोन गाड्या, असा मिळून ११ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित दोघा संशयतांवर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड येथे दोघा व्यक्तीकडून बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाकडून येथील बस स्थानकाच्या समोर सापळा रचण्यात आला. यावेळी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण संशयास्पद रित्या दिसून आले. दरम्यान त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यात बिबट्यासह अन्य एका प्राण्याचे कातडे आढळून आले. त्या प्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी संदिप भोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग , पोलीस उप निरीक्षक आर.बी.शेळके , ए.ए. गंगावणे , पी.एस.कदम , के.ए.केसरकर , एस.एस.खाडये , आर.एम.इंगळे यांनी केली.