You are currently viewing श्रावण सरी ( येई आनंदा उधाण …)

श्रावण सरी ( येई आनंदा उधाण …)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना

रिम झिम हा श्रावण न्हाऊ घालतो मनाला
येती माहेरवाशिणी येती नाचत सणाला…
मायमाहेर ते प्रिय आहे सुखाची ती ठेव
जावो किती ही लांब ती माहेरच प्रिय गाव …

श्रावणातले सण नि झोपाळे अती गोडं
मर्मबंधातली ठेव नाही दुजी, बिनतोडं
झिम्मा खेळती फुगड्या मनी सोडविती कोडं
पुजा मंगळागौरीची नैवेद्य गोडधोडं…

सख्यासजणाची सय गोड हसू खुले गाली
खेळतांना मंगळागौर सय सख्याची ग आली
नव्यानवतीचे दिस प्राणप्रिय असे सखा
तो आठवता मनी काळजाचा चुके ठोका…

अंगी उठे शिरशिरी मोहरून येई अंग
चिंतनातच सख्याच्या सया होती पहा दंग
वाटे जवळ असावा त्याने पहावे रूपडे
आरशात पाहताच भास .. इश्यऽऽऽ, अहा गडे..

लाजून त्या होती चूर गाली फुलती गुलाब
नयनात उतरते जणू पहाटेची लाज
खुदूखुदू हसू गाली नाही सांगत कोणाला
येती माहेरात पण आवरतात मनाला ….

असा श्रावण श्रावण हिरवाईचे कोंदण
सारी सृष्टी मोहरते येई आनंदा उधाण
सारी फुलती सुमने प्रफुल्लीत सारी मने
श्रावणाच्या महिन्यात नाही नाही काही उणे …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २ ॲागष्ट २०२२
वेळ : दुपारी ३: ४०

प्रतिक्रिया व्यक्त करा