You are currently viewing १ऑगस्ट महसूल दिनानिमित्त प्रशासनातील काही अधिकारी…..

१ऑगस्ट महसूल दिनानिमित्त प्रशासनातील काही अधिकारी…..

*१ऑगस्ट महसूल दिनानिमित्त प्रशासनातील काही अधिकारी…..*

*लेख सादर: श्री नरेशचंद्र काठोळे*

१ ऑगस्ट हा सर्वत्र महसूल दिन म्हणून पाळण्यात येतो .मी जेव्हा १२ मे २००० रोजी मिशन आयएएस या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हापासून किमान ५०० आयएएस, आयपीएस, आयआरएस सनदी व राजपत्रीत अधिकारी यांना भेटण्याचा योग आला. त्यापैकी जवळपास ३५० आयएएस, आयपीएस अधिकारी आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. आज मिशन आयएएसमध्ये या ना त्या निमित्ताने भेटलेल्या काही अधिकाऱ्यांचा हा संक्षिप्त परिचय. माननीय श्री दिलीप पांढरपट्टे हे सध्या अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत .त्यांची माझी भेट माझ्या तपोवनच्या घरी झाली. मी तेव्हा पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांच्यात तपोवन या कुष्ठधामामध्ये श्री संत अच्युत महाराज यांच्या शेजारी राहत होतो. दाजी साहेबांनी व त्यांची कन्या श्रीमती अनुताई भागवत यांनी मला नेहमीच्या निवासस्थानासह पाच रूम असलेले एक गेस्ट हाऊस अतिरिक्त राहण्यासाठी दिले होते. कविवर्य श्री सुरेश भट जेव्हा जेव्हा अमरावतीला यायचे तेव्हा तेव्हा ते माझ्या या गेस्ट हाऊसमध्ये थांबायचे .त्यांना भेटण्याला येणाऱ्यांची संख्या प्रचंड असायची .असेच एकदा मा. श्री दिलीप पांढरपट्टेसाहेब माझ्याकडे कविवर्य श्री सुरेश भटांना भेटायला येऊन गेले होते .पांढरपट्टेसाहेबांनी सनदी अधिकाऱ्यांबरोबर स्वतःला साहित्याला वाहून घेतलेले आहे .आज गझलच्या क्षेत्रात त्यांच्या चांगला नावलौकिक आहे. काही पुस्तके पण त्यांच्या नावावर आहेत. आणि एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. गजलेवर तर त्यांचे खूपच प्रेम आहे.मग गझलचा कार्यक्रम मुंबईला असो की पुण्याला असो किंवा अमरावती जिल्ह्यातील एखाद्या खेड्यात असो तिथे देखील हजेरी लावल्याशिवाय ते राहत नाहीत. मागे गझल नवाज श्री भीमराव पांचाळे यांनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या त्यांच्या लहानशा गावात गझल संमेलन भरवले होते. पांढरपट्टे साहेब मुंबईवरून या कार्यक्रमाला आले होते .साहेब धुळ्याला जिल्हाधिकारी असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो .तसेच मुंबईच्या गझल संमेलनामध्ये मी माझा सुरेश भट कॉफी टेबल बुक हा ग्रंथ त्यांना दाखविला असता त्यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले होते .असा एक सामाजिक भान असलेला साहित्यिक जाणीवेचा विभागीय आयुक्त अमरावतीला लाभला हे खरोखरच अमरावतीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. डॉ.श्रीकर परदेशी सध्या परदेशीसाहेब महाराष्ट्रातील मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते पीएमओ कार्यालयात म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये कार्यरत होते. एक आदर्श आयएएस अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ते जेव्हा आयएएस झाले तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. पुण्यातील सर्वसाधारण भागात ते राहत होते .मी त्यांना अमरावतीला येण्याचे निमंत्रण दिले .मी परदेशी सरांना भेटलो तेव्हा श्रीमती विद्युत वरखेडकर ह्या देखील त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या आता चंद्रपूरला अप्पर जिल्हाधिकारी आहेत .मी परदेशी सरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्याकडे फक्त तीनच खुर्च्या होत्या .एका खुर्चीवर स्वतः सर दुसऱ्या खुर्चीवर विद्युत वरखेडकर व एका खुर्चीवर सरांच्या आई बसल्या होत्या .मी जाताच आईसाहेबांनी त्यांची खुर्ची मला खाली करून दिली व त्या स्वतः जमिनीवर बसल्या. त्या म्हणाल्या तुम्ही इतक्या दुरून माझ्या मुलाचे कौतुक करायला आलेले आहेत. तुम्ही खुर्चीवर बसा. श्रीकर परदेशी सरांनी जे उपक्रम महाराष्ट्रात राबवले ते मैलाचे दगड म्हणून इतिहासात नोंदवले गेलेले आहेत .यवतमाळला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी लिपिक भरतीसाठी घेतलेली परीक्षा इतिहासात नोंदल्या गेली आहे .पुढे नांदेडला कार्यरत असताना त्यांनी काँपी मुक्त अभियान राबविले आणि त्याची नोंद महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात कॉपी मुक्त झालेला आहे.
श्री. विकास खारगे विकास खारगे यांचे नाव महाराष्ट्रातील प्रशासनात दबदबा निर्माण करणारे आहे .१२ मे २००० रोजी म्हणजे २२ वर्षांपूर्वी त्यांनी अमरावतीला येऊन मिशन आयएएस या उपक्रमाचे उद्घाटन केले. खारगेसाहेब मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत .विश्वास नागरे पाटलांनी आपल्या मन मे है विश्वास या आपल्या आत्मचरित्रामध्ये खारगेसाहेबांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. त्यांचे मार्गदर्शन मला मिळाले नसते तर माझ्या जीवनाला चुकीचे वळण लागले असते असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे .खारगेसाहेब ज्या ज्या क्षेत्रांमध्ये कार्यरत होते त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांचा सर्वत्र नाव लौकिक आहे .म्हणूनच जेव्हा केदारनाथ बद्रीनाथला ढगफुटी झाली आणि महाराष्ट्रातील पर्यटक अडचणीत आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाठवले ते खारगे साहेबांना. खारगेसाहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून अनेकांचे प्राण वाचवले आणि त्यांना सुखरूप महाराष्ट्रात परत आणले .अतिशय चांगले काम केल्याबद्दल त्यांना शासनातर्फे गौरविण्यात आलेले आहे .हे एवढे मोठे जरी असले तरी प्रत्येक वेळा अमरावतीला आले म्हणजे मला आवर्जून फोन करतात .भेटीला बोलावतात आणि त्यांना रात्री बारा वाजता जरी एसएमएस केला तरी त्याचे लगेचच उत्तर देतात इतके ते संवेदनशील आहेत.श्री. जे पी डांगेसाहेब हे आमच्या महाराष्ट्रातील विदर्भातील तेल्हारा तालुक्यातील खेल देशपांडे येथील राहणारे. जे पी डांगे साहेब आता मुख्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत .तसेच काही काळ ते वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. एक मुख्य सचिव किती लोकाभिमुख असू शकतो याचे उदाहरण म्हणजे माननीय श्री जे पी डांगे. ते मुख्य सचिव असताना मिशन आयएएसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये १३ वेळा येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्राचा मुख्य सचिव एका संस्थेच्या कार्यक्रमाला तेरा वेळा सहभागी होतो ही मला असं वाटते आगळी वेगळी बाब आहे. साहेबांनी मला कधी नाही म्हटले नाही .कार्यक्रम कोणताही असो साहेब सातत्याने येत गेले आणि आम्हाला प्रोत्साहन देत गेले.श्री तुकाराम मुंढे तुकाराम मुंढेंचा एक क्रियाशील सनदी अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा आहे .कमी कालावधीमध्ये अनेक बदल्या झालेल्या अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. आपल्या कार्य कौशल्यामुळे त्यांनी स्वतःचा आगळावेळा ठसा महाराष्ट्राच्या सनदी अधिकाऱ्यांच्या किताबात नोंदवला आहे .ते जेव्हा आयएएस झाले तेव्हा आठवणीने अमरावतीला आमच्याकडे आले होते . तेव्हा आमच्याकडे आर्थिक सुबत्ता नव्हती. ते खाजगी बसने आले. मी त्यांना घ्यायला टू व्हीलर ने गेलो आणि माझ्या घरी घेऊन आलो .आज जर मी जेव्हा मी लोकांना सांगतो की तुकाराम मुंढे माझ्या घरी थांबलेले आहेत. तर ते आश्चर्यचकित होतात .पण या माणसाने राजकारणी लोकांसमोर मान झुकवली नाही.जितने वाले कोई अलग काम नही करते वह हर काम अलग ढंगसे करते है.हा शेर त्यांना तंतोतंत लागू पडतो. आजही त्यांची बदली झाली तेव्हा लोकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा जयजयकार केलेला आहे .असे अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये लाभावेत अशी अपेक्षा आहे. श्री.किरण गित्ते …किरण गित्ते हे जेव्हा आयएएसची परीक्षा पास झाले तेव्हा मी त्यांना पुण्याला भेटायला गेलो होतो .त्यांना अमरावतीला येण्याचे निमंत्रण दिले. पुढे योगायोगाने साहेब अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून आले .ते अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून आल्यानंतर आमच्या कामाला प्रचंड वेग आला. साहेबांनी प्रशासनाची दारं आमच्यासाठी मोकळी करून दिली. मिशन आयएएस जिल्हा प्रशासन व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही जेवढे कार्यक्रम स्पर्धा परीक्षांसाठी राबविले तेवढे महाराष्ट्रात कोणीच राबविले नाहीत. साहेबांनी अमरावती जिल्हा स्पर्धा परीक्षांमय करून टाकला. ते मला म्हणायचे तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या जगतातील भीष्मपितामह आहात .त्यांनी माझ्या सहकार्याने परळी वैजनाथ या त्यांच्या गावी एक चांगले आहे आयएएस सेंटर स्थापन करून घेतले. मी स्वतः तिथे मुक्कामी राहिलो आणि केंद्र नावारूपाला आल्यानंतर अमरावतीला परत आलो. आज किरण गीते साहेब त्रिपुराला आहेत .पण त्यांनी अमरावतीला केलेले कार्य लोकांच्या अजूनही लक्षात आहे .डाँ.पुरुषोत्तम भापकर पुरुषोत्तम भापकर यांचा उल्लेख एक प्रयोगशील लोकाभिमुख साधा सरळ अधिकारी म्हणून करावा लागेल .कार्यालयात सर्वात आधी येणारा व सर्वात उशिरा जाणारा अधिकारी म्हणजे पुरुषोत्तम भापकरसाहेब .आल्याब रोबर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय साफ करण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी स्वतः झाडू हातात घेतला आणि खऱ्या अर्थाने श्री संत गाडगेबाबा यांचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अगदी साध्या साध्या कार्यक्रमांमध्ये साहेब जायचे .लोकांमध्ये मिसळून जायचे. कार्यालय संपले म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचा कोट अंगावरून बाजूला ठेवायचे. त्यामुळे आज ते सेवानिवृत्त झाले तरी त्यांचा नावलौकिक कायम आहे .श्री रवींद्र जाधव महामहीम राष्ट्रपती श्री प्रतिभाताई पाटील यांनी जेव्हा राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तेव्हा त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी असलेले श्री रवींद्र जाधव यांना आपले विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून राष्ट्रपती भवनात जागा दिली. राष्ट्रपतींनी रवींद्र जाधव यांची निवड करणे यामध्ये त्यांचा सर्व कार्य कर्तृत्वाचा आलेख आलेला आहे .चिखलदऱ्याच्या शासकीय विद्यानिकेतन मध्ये शिकलेले हे गृहस्थ आज राष्ट्रपती भवनातून सेवानिवृत्त होऊन आपल्या जळगावला राहत आहेत. खरं म्हणजे चिखलदराला विद्यानिकेतन मध्ये असताना त्यांना फरशा पुसाव्या लागल्या. जंगलातून लाकडे तोडून आणावी लागली .मुलांना वाढण्याचे कामही करावे लागले .परंतु त्यावर मात करून ते एक चांगले आयएएस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. जाधव साहेब ज्यांना ज्यांना भेटले ते माणसे जाधव साहेबांना आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत.
–=============
*प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डाँ.पंजाबराव* देशमुख अकादमी अमरावती कॅम्प 9890967003 प्रकाशनार्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा