You are currently viewing हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण नगरपालिकेचे नियोजन व कार्यक्रमांचे आयोजन

हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण नगरपालिकेचे नियोजन व कार्यक्रमांचे आयोजन

मालवण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार असून यासाठी मालवण नगरपालिकेने शहरात ७ हजार कापडी तिरंगा ध्वज वाटप करण्याचे नियोजन केले आहे. हे ध्वज वाटप मोफत असून यासाठी सामाजिक संस्था, बचत गट, राजकीय पक्ष, बँका यांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. ९ ते १३ ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मालवण नगरपालिका येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, अधिकारी श्री. घाडगे, शहर समन्वयक निखिल नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे म्हणाले, हर घर तिरंगा उपक्रमासाठी मालवण नगरपालिकेकडून २०× ३० इंच म्हणजेच ५०× ७५ सेंमी आकाराचे तिरंगा ध्वज पुरविण्यात येणार आहेत. मालवण शहरातील नोंदीत घर मालमत्तांची संख्या ही ६००० असल्याने नगरपालिकेकडून ७००० ध्वज पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात ५००० ध्वज नगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणार असून यात सामाजिक संस्था व बचत गटांचे सहकार्य लाभणार आहे. तर युनियन बँक कडून १००० ध्वज पुरविण्यात येणार असून अधिक १००० ध्वजही उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. हे ध्वज कापडी असणार असून नगरपालिकेच्या https://forms.gle/hXVqxkQeZAKcAgyp8 या लिंकवरील गुगल फॉर्मवर नागरिकांनी आपली माहिती भरून नोंदणी करावयाची आहे, प्रथम नोंदणी- प्रथम प्राधान्य यानुसार ध्वज वितरित करण्यात येतील. ऑनलाइन नोंदणी न केलेल्या घरांनाही ध्वज वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप मोफत असून नागरिक स्व:खुशीने ध्वजनिधी म्हणून किरकोळ रक्कम नागरपालिकेकडे जमा करू शकतात. तसेच या ध्वजांचे वाटप हे सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. एका घरी व एका कॉम्प्लेक्स मध्ये एकच ध्वज दिला जाणार असून दि. १३ ऑगस्ट रोजी नागरिकांनी हा ध्वज आपल्या घरावर उभ्या स्थितीत लावायचा असून १५ ऑगस्ट रोजी सुर्यास्ताआधी काढायचा आहे. ध्वजाचा अवमान होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता संपूर्ण शहरात सामूहिक राष्ट्रगान म्हटले जाणार असून यासाठी १०:५५ वाजता नगरपालिकेकडून भोंगा वाजवून अलर्ट दिला जाणार असून १०:५९ वाजता पुन्हा भोंगा वाजवून नागरिकांना आहे त्याठिकाणी उभे राहण्याची सूचना दिली जाणार असून ११ वाजता राष्ट्रगान म्हणण्यास सुरुवात करावयाची आहे. दि. १० ऑगस्ट रोजी दांडी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. दि. १२ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्लास्टिक मुक्त भारत संकल्पना या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांचे मार्गदर्शन चर्चासत्र होणार आहे. याच वेळी नगरपालिकेने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी घेतलेल्या इकोब्रिक्स या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. १३ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वातंत्र्याचे महत्व सांगणारे ‘मी भारतीय’ हे नाटक मामा वरेरकर नाट्यगृह येथे सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन प्रदीप तुंगारे, संकल्पना व दिग्दर्शन- रवींद्र देवधर, सुजाता शेलटकर, अभिनय – अक्षय सातार्डेकर व रवींद्र देवधर यांनी केले आहे. मालवण वासीयांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा