You are currently viewing ६ ऑगस्टला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ४ थ्या स्मृतीदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

६ ऑगस्टला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ४ थ्या स्मृतीदिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यात ६ ऑगस्टला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आरसीसीआय आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळांच्या संयुक्त विद्यमानाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ गटात घेतली जाणार असून या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहीद मेजर रावराणेच्या स्मृतीदिनाचे औचित्याने तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहे. मेजर रावराणेंचा जीवन प्रवास विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावा या हेतूने रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळ वैभववाडी यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पाचवी ते सातवी हा प्रथम गट असून आठवी ते दहावी असा दुसरा गट आहे. प्रथम गटाकरिता “माझा भारत माझा अभिमान” असा विषय असून निबंधकरीता शब्द मर्यादा ५०० इतकी आहे. तर दुसऱ्या गटाकरिता शब्द मर्यादा ७५० आहे. दोनही गटासाठी बक्षीस अनुक्रमे प्रथम क्रमांक रुपये १ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ७५० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास ५०० रुपये व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ २५० रुपये अशी आहेत.

तृतीय गट अकरावी, बारावी विद्यार्थ्यांचा असून या गटाकरिता “बलशाली भारत काळाची गरज” असा विषय आहे. त्याकरिता शब्द मर्यादा १००० इतकी आहे. या गटाकरिता प्रथम क्रमांक २ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास १ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास १ हजार रुपये व सन्मानचिन्ह उत्तेजनार्थ ५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके आहेत.

चौथा गट हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. या गटासाठी “हुतात्मा मेजर कौस्तुभराव रावराणे एक प्रेरणास्थान” असा विषय असून याकरिता १५०० इतकी शब्द मर्यादा आहे. या गटातील प्रथम क्रमांकास ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक २ हजार ५०० रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास १ हजार ५०० व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ ५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके आहेत.

सर्व गटातील स्पर्धा या त्या त्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये ६ ऑगस्टला घेण्यात येतील. त्यानंतर स्पर्धकांचे निबंध ९ ऑगस्टला संयोजक संजय रावराणे यांच्याकडे एकत्र केले जाणार आहेत. त्यानंतर आयोजक समिती हे निबंध तपासणीसाठी तज्ञांकडे देणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १५ ऑगस्टला आनंदीबाई रावराणे महाविद्यालय सकाळी १० वाजता होणार आहे. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सागर रावराणे आणि प्रकाश काळे यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा