महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने
राज्य महावितरण कंपनीने इंधन समायोजन आकार या नावाखाली वीज ग्राहकांवर लादलेली दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्टेशन रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली.तसेच सदर मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी यांना देण्यात आले.
राज्य महावितरण कंपनीचे इंधन समायोजन आकार परिपत्रकाप्रमाणे राज्यातील सर्वच २ कोटी ८५ लाख वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नावाखाली सरासरी २० टक्के इतकी प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ जुलैमध्ये आलेल्या बिलापासून पुढील पाच महिन्यांसाठी वीज ग्राहकांवर लादली आहे. ही दरवाढ राज्यातील कोणत्याही ग्राहकांना परवडणारी नाही. या धोरणाचा फटका येथील रहिवाशी, व्यापारी, औद्योगिक, पॉवरलूम आदी ग्राहकांना बसणार आहे. या दरवाढीतून केवळ इचलकरंजी शहरातून सुमारे साडे दहा कोटी इतकी अतिरिक्त रक्कम प्रतिमहिना भरावी लागणार आहे. मुळातच कोरोनामधील २ वर्षांच्या कालावधीत यंत्रमाग व्यवसाय पुर्णपणे ठप्प होता. त्याचा परिणाम इतरही पुरक व्यवसायावर झाला होता. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने केलेली दरवाढ अन्यायी असून ती तातडीने मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्टेशन रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलांची होळी करण्यात आली.तसेच सदर मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी यांना देण्यात आले.तसेच या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात काॅंग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, शशिकांत देसाई,अजित मिणेकर, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, रविराज पाटील, प्रशांत लोले, समीर शिरगावे, सचिन साठे, रियाज जमादार, विद्या भोपळे, सुदाम साळुंखे, रवि वासुदेव, अशोक नांद्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.