जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख
आषाढ महिन्यातील शुक्लपक्ष एकादशी पासून चातुर्मास सुरु होतो.आणि कार्तिक एकादशीस तो संपतो.
आषाढ,श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक हे चार महिने म्हणजेच चातुर्मास.हा काळ म्हणजे भगवान विष्णुच्या योगनिद्रेचा काळ.या काळात तपस्या,साधना,व्रत केल्यास
फलदायी असते.मात्र या महिन्यात सूर्य ,चंद्र ,प्रकृतीचे तेज कमी होते म्हणून विवाह ,मुंज,गृहप्रवेश आदी शुभकार्ये
करू नये असे शास्र सांगते. प्रवासही टाळावेत.
ऊपवास,तप,जप,नदीत स्नान ,पानावर भोजन,
एकभुक्त राहणे असे संकल्प केले जातात.
विशेषत:श्रावण महिना म्हणजे ,सण सोहळे आणि विवीध व्रते संकल्पनाचाच मास.
शिवामूठ,मंगळागौर या व्रतांबरोबरच शिवपुराणाचे वाचन,कथाश्रवण वगैरेही अवलंबले जाते. श्रावण महिना
म्हणजे निसर्ग लावण्य. चित्तवृत्तीची प्रसन्नता. अशा काळात
केलेले ग्रंथवाचन हे मनाला सुसंकृत करते. सद्विचार आणि सन्मार्गाची दालने खोलते.मूळातच कुठलाही संकल्प अथवा व्रत याला जसे धार्मिक महत्व असते तसेच ते ऋतुचक्राच्या
बदलत्या नियमावर अवलंबून असते. शास्त्र,विज्ञान आणि धर्म हे एकमेकांना जेव्हां पूरक होतात तेव्हां ठरते व्रत ..नियम.आणि अशी व्रते ही प्रकृती आणि मन निरोगी ठेवतात म्हणून ती जरुर पाळावीत. त्यांत अंधश्रद्धा नसते.
त्यात नैसर्गिक नियमांचे पालन असते.
मला आठवते श्रावणात माझ्या माहेरी ,श्रावणी सोमवार आणि शनिवार पाळले जायचे. सकाळी ऊपवास आणि संध्याकाळी सूर्योदयापूर्वी जेवण.शनिवारी केळीच्या पानावर आणि सोमवारी दिंडीच्या पानावर भोजन असायचे. आई सोवळ्यात स्वयंपाक करायची. त्या सात्विक
स्वयंपाकाचा सुगंध आजही मी घेत असते.तांदळाच्या शेवया,गुळ घातलेले नारळाचे दूध,मुगाचे बिर्ढ,अळुच्या वड्या,आंबेमोहर तांदळाचा भात आणि घट्ट पिवळे वरण,व साजूक तुपाची धार.पानातल्या जेवणाचा एक वेगळा स्वाद असायचा.त्यावेळी त्याचे महत्व कळले नव्हते.पण आता वाचनातून समृद्ध झाले.ती नुसतीच प्रथा नव्हती. त्यात वैद्यकीय शास्त्र होते.केळीच्या ,दिंडीच्या पानातली ऊपयुक्त रसायने अन्नात मिसळून पचनक्रियेस मदत करतात.
अजुनही हे श्रावणी सोमवार,शनिवारचे हे सोपे ,निसर्गाधार असलेले व्रत करायला मला आवडते.त्यातले शास्त्र आणि
सौंदर्य जपण्याचा मी यथाशक्ती मनापासून प्रयत्न करते..
आज श्रावणातला पहिला दिवस. हा हसरा हिरवा ,संस्कृती,परंपरा जपणारा श्रावण सर्वांना आनंददायी होवो!!
*राधिका भांडारकर पुणे*