कणकवली
आपल्या साहित्य लेखनातून उपेक्षित-शोषित घटकांच जगणं समाजासमोर हाणून विदेशातही कीर्ती मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने कणकवली विद्यामंदिर हायस्कूल समोरील महाराजा सभागृहात सोमवार १ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. “अण्णाभाऊ साठे आठवणींचा जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्य महासचिव प्रा. डॉ. राज ताडेराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी अजय कांडर आणि लेखक प्रा.डॉ सोमनाथ कदम प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प अधिकारी विजय कदम, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट चे निमंत्रक एड. सुदीप कांबळे, कार्यकर्ते व कवी राजेश कदम व साहित्य- समाज चळवळीतील कार्यकर्ते अच्युत देसाई यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर लेखन करणारे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे म्हणजे चालते बोलते विद्यापीठ. अण्णा भाऊंनी जे लेखन केले त्यामध्ये विचार मूल्य होते.तळातील वर्गाची जाणीव अधोरेखित व्हावी आणि त्यातून तळातल्या वर्गामध्ये परिवर्तन व्हावे असाही विचार त्यामागे होता. यामुळेच अलीकडेच महाराष्ट्रातील साहित्यिकांनी अण्णा भाऊंचा १ ऑगस्ट जयंती दिवस हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी खुली मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित होत असून या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक श्री. राजाराम फाळके, प्रा. मनोहर कांबळे, सचिन कोर्लेकर,विकास मंगल, संतोष बाबर, डॉ. मारोती चव्हाण यांनी केले आहे.