खरे सूत्रधार समोर यावेत यासाठी गुन्हा दाखल करून चौकशीची केली मागणी
गोरगरीब जनतेसाठी शासकीय रास्त दराच्या दुकानात दिले जाणारे तांदूळ एका ट्रक मध्ये कुडाळ MIDC येथील बजाज राईस मिलच्या आवारात काल पकडण्यात आले. अशा प्रकारे शासकीय गोदामांमधून तांदूळ गोळा करून ते पॉलिश करण्यासाठी बजाज राईस मिल मध्ये नेले जातात व नंतर बाजारात चड्या दराने विक्री केले जातात. अशी माहिती समोर आली असून हा सर्व प्रकार दुर्दैवी असून दखलपात्र देखील आहे.
त्यामुळे यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत ते समोर येणे गरजेचे आहे. अगदी सहा-सात महिन्यांपूर्वी धान्याने भरलेला एक पूर्ण ट्रक धान्य गोदामात न जाता परस्पर विक्रीसाठी बाहेर नेण्यात आले. अशी कुजबुज गोदाम कर्मचाऱ्यांकडून ऐकीवात आलेली होती. तर रात्रीच्या सुमारास शासकीय धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून दोन पोती MIDC येथे उतरवून नंतर ट्रक गावोगावी धान्य दुकानांकडे रवाना केला जातो. असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.
काल घडलेल्या घटनेनंतर पंचनामा नोंद केल्याची माहिती मिळत आहे. सदरचा प्रकार अतिशय भयंकर असल्याने नुसता महसूल विभागाकडून चौकशी प्रक्रियेचा फार्स केल्यास ह्या तस्करीच्या पाठीमागील खरे सूत्रधार आणि अन्य रॅकेट पुढे येणार नाही अशी शक्यता असल्याने कालच्या प्रकारानंतर बजाज राईस मिल व्यवस्थापना सहित जबाबदार गोडाऊन कर्मचारी आदि दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जेणेकरून ह्या भष्टाचाराची पोलीस यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होईल व यामागचे पूर्ण रॅकेट समोर येईल अशी आग्रही मागणी मनसेने कुडाळ तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, कुडाळ उपशहर अध्यक्ष वैभव परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.