सावंतवाडी
कोलगाव चाफेआळी येथील सौ सुमन सुदन गोसावी (३४ ) ही महिला गेल्या सात वर्षांपासून दाता खालच्या हाडाच्या (लॉवर जॉ) च्या दुर्मिळ व्याधींपासून त्रस्त आहे. आतापर्यंत लहान मोठ्या सहा शस्त्रक्रिया झालेल्या सुमन यांच्या पुढील दोन शस्त्रक्रियेसाठी सुमारे अडीच लाख रुपयांची गरज आहे. या शस्त्रक्रियेसाठी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी. ही तातडीची मदत सौ सुमन यांना नवसंजीवनी देऊ शकते.
कोलगाव येथील सौ सुमन यांचे पती कोल्ड्रिंक्सच्या दुकानात कामाला आहेत. तर त्या गावातील सण व उत्सवात किरकोळ वस्तू विकून तसेच काम असेल तेव्हा मंगल कार्यालयात जेवण वाढायला जाऊन मुलांचा शिक्षण खर्च भागवत असे. जमीन अथवा शेतीसह इतर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. अशा परिस्थितीत सात वर्षापूर्वी २०१५ मध्ये सौ सुमन यांना दाता खालच्या हाडाची व्याधी जडल्यामुळे त्या त्रस्त होत्या. या आजारावर वर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू केले असता त्यांच्या दाता खालच्या या हाडांमध्ये गाठ होऊन ती प्रसरण होऊन इन्फेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले. या आजाराने गोसावी कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले. कारण यासाठी तीन शस्त्रक्रिया करायच्या होत्या. त्यानंतर बांबोळी रुग्णालयात सुमन यांच्या दाताखालचे निरुपयोगी हाड काढून त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरी कडचच्या तीन पैकी एक हाड काढून त्या ठिकाणी बसविण्यात आले. तसेच याच वेळी तोंडाच्या त्वचेचा काही भाग काढून प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यानंतर या दाताच्या हाडाच्या जबड्यावर दात बसवण्यात येणार होते. मात्र पैशाची तजवीज न झाल्याने हा विषय जैसे थे राहिला.
दरम्यान दोन वर्षापूर्वी सौ सुमन यांना दाताखाली बसविलेल्या हाडावरची प्लेट सरकल्याने पुन्हा त्रास होऊ लागला. त्यावेळी निदान केले असता या बसवलेल्या हाडामध्ये पाणी होऊन ते वितळून निरुपयोगी झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच गोसावी कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. त्यानंतर बांबूळी येथील वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार मुंबई – गिरगाव येथील रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये हे हाड दोन शस्त्रक्रियेद्वारे बसवण्याचे निश्चित झाले. मात्र यासाठी नऊ लाखाचा खर्च ऐकून गोसावी कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न पडला होता. त्यानंतर सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर गेल्यावर्षी या शस्त्रक्रियेसाठी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून आठ लाखाची सोय झाली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी सौ सुमन यांच्या डाव्या पायाच्या पोटरी कडचे हाड काढून दाताखाली बसविण्यात आले. आता या बसवलेल्या दाताखालच्या हाडावर शस्त्रक्रियेद्वारे दात बसवण्यात येणार आहे. मात्र दाताच्या जबड्याकडचा भाग चेहऱ्याच्या आतील बाजूला चिकटला असून तो वेगळा केल्यानंतरच हे दात बसवण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च आहे.
अतिशय दुर्मिळ आजार असलेल्या या आजारावर आतापर्यंत लहान मोठ्या सहा शस्त्रक्रिया सुमन गोसावी यांच्यावर करण्यात आल्या आहेत. मात्र त्या अजूनही खचलेल्या नाहीत त्यांना यातून सावरत पुन्हा आपले पूर्वीचे जीवन जगण्याची इच्छा आहे.
सध्या या माऊलीची स्थिती पाहिल्यावरकुणालाही गहिवरून येईल. सुमन यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. आतापर्यंत सुमनच्या उपचारासाठी गोसावी कुटुंबियांनी होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे त्यांनी जिल्हा वासीयाना मदतीसाठी हाक दिली आहे
ज्याना सुमन यांना मदत करावयाची आहे त्यांनी सुमन सुधन गोसावी खाते नंबर १४१०१०११००१३५९६ आय एफ एस सी कोड बी के आय डी ०००१४१० बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी वर जमा करावयाची आहे. अधिक माहितीसाठी ९४०५४१६०८५ या मोबाईलवर संपर्क साधावा.