सोनिया गांधींची राजकीय सूडबुद्धीने सुरु असलेली छळवणूक थांबवा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
ओरोस
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीचा सहारा घेऊन राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकार मार्फत होणारी छळवणूक ताबडतोब थांबवावी. या मागणीसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओरोस येथे मूक सत्याग्रह करण्यात आला. तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र शासनाला देण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सूडबुद्धीने होत असलेली ही छळवणूक तात्काळ थांबवावी. अशी मागणी करत केंद्र शासनाच्या या सूडबुद्धी कारभाराचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या नजीक मूक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात साईनाथ चव्हाण, अभय शिरसाठ , विकास सावंत, अरविंद मोडकर, विभावरी सुकी, विजय प्रभू, प्रकाश जैतापकर, आदि प्रमुख पदधिकाऱ्यासह सर्व तालुक्यांचे पदाधिकाऱ्यानी सहभाग घेत केंद्रशासना विरोधी आज सत्याग्रह आंदोलन यशस्वी केले. तर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
या निवेदनात त्यांनी सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भारतातील गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे उद्योजक, नोकरवर्ग, शोषित ,पीडित जनता या सर्वांचा आवाज बनून सन्माननीय सोनिया गांधी व राहुल गांधी हे केंद्र सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीला जात आहे. कधी नवे एवढी प्रचंड महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने देशाला आर्थिक संकटात ढकलले आहे. याबाबत भारतीय जनतेचा लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केंद्र सरकार हा खटाटोप करत आहे. सोनिया गांधी या आजारातून पूर्णतः बऱ्या झालेल्या नसताना सुद्धा ज्या प्रकरणांमध्ये त्यांना पुन्हा पुन्हा बोलाउन त्यांची ईडीमार्फत वारंवार चौकशी करून छळवणूक केली जात आहे. ही छळवणूक तात्काळ थांबवावी. अशी मागणी करणारे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.