You are currently viewing वॅक्सिन आल्याशिवाय शाळा, कॉलेज सुरु करू नयेत….

वॅक्सिन आल्याशिवाय शाळा, कॉलेज सुरु करू नयेत….

आम.कपील पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी….

तळेरे प्रतिनिधी :

वॅक्सिन आल्याशिवाय महाराष्ट्रातील शाळा, कॉलेज सुरु करू नयेत,दोन शैक्षणिक वर्ष क्लब करावे अशी मागणी शिक्षक भारती चे संस्थापक व विधान परिषदेचे सदस्य तथा शिक्षक आम. कपील पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे, अशी माहिती शिक्षक भारती राज्याचे प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली म्हटले आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
शाळा, कॉलेज सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर विचार करण्याचं मंत्रिमंडळाने ठरवल्याचं नुकतंच वाचनात आले हा उचित निर्णय आहे.
शाळा, कॉलेज दिवाळीपर्यंत सहा महिने बंद राहणार आहेत. ऑनलाईन शिक्षण शहरी भागात 50% तर ग्रामीण भागात फक्त 35% विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलं आहे. ही बाब लक्षात घेता यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठे होणार आहे. वॅक्सिन आल्याशिवाय शाळा, कॉलेज सुरु करण्यास पालकांचा विरोध आहे. दिवाळीनंतर निर्णय घेताना मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाला आम.कपील पाटील यांनी विनंती केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाचे शैक्षणिक वर्ष 2020 – 21 आणि पुढील शैक्षणिक वर्ष 2021 – 22 ही दोन्ही क्लब करावीत. मुख्य सणांच्या सुट्ट्या वगळून अन्य सुट्ट्या कमी कराव्यात. महापुरुषांच्या जयंतींनाही शाळा, कॉलेज चालू ठेवावीत.अभ्यासक्रम कुठेही कमी न करता तो पुढील काळात भरून काढण्यात यावा.
डिसेंबर महिन्यात वॅक्सिन आले तर जानेवारी पासून त्यावेळची परिस्थिती बघून शाळा, कॉलेज रीतसर सुरू करावीत. सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम वॅक्सिन देण्यात यावे.
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यात अभ्यासक्रम भरून काढावा.
सहामाही परीक्षा किंवा सत्र परीक्षा घेऊ नयेत. थेट वार्षिक परीक्षा आणि 10 वी, 12 वी च्या परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहील्या आठवड्यात त्यावेळची परिस्थिती बघून घेण्यात याव्यात.
2020 – 21 च्या पहिल्या शैक्षणिक वर्षात राहिलेला अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2021 – 22 मध्ये भरून काढण्यात यावा.
पुढील शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात यावे.
याबद्दल सर्वांशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत जानेवारीपूर्वी शाळा, कॉलेज प्रत्यक्ष सुरू करू नयेत.
तोपर्यंत शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून वगळून फक्त वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. मागच्या काही महिन्यात काही शिक्षक, कर्मचारी यांचे कोविडमुळे झालेले निधन लक्षात घेता त्यांना शाळा, कॉलेजमध्ये येण्याची सक्ती करू नये.
ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा