वीज पुरवठ्यातही जिल्हा अव्वलस्थानी
– आमदार वैभव नाईक
सिंधुदुर्गनगरी
आपल्या जिल्ह्यात विजेच्या गळतीचे प्रमाण कमी आहे. तसेच विजेची चोरीही होत नाही. वीज वितरणाच्या बाबतही जिल्हा अव्वलस्थानी आहे. हे महावितरणच्या चांगल्या कामाचे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार आमदार वैभव नाईक यांनी काढले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त येतील नियोजन समितीच्या सभागृहामध्ये उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत. त्यावेळी श्री. नाईक बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, रत्नागिरी गॅर पॉवर प्रोजेक्टचे व्यवस्थापक विकास सिंग आदी उपस्थित होते.
विद्युत कर्मचारी चांगली सेवा देत असल्याचे सांगून आमदार श्री. नाईक म्हणाले, 90 टक्के पेक्षा जास्त वीज ग्राहकांकडे विद्युत कर्मचाऱ्यांचा क्रमांक असतो. कोणतीही अडचण आली की त्यांना फोन केला जातो. त्यासाठी वेळ पाहिली जात नाही. हे कर्मचारीही कोणतीही वेळ असो तात्काळ काम करण्यास उपस्थित असतात. चक्रीवादळासारख्या काळातही वीज वितरण कंपनीने खंडीत झालेला वीज पुरवठा विक्रमी वेळेत सुरळीत केला आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे लागेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक उपक्रम राबलवे जात आहेत. जिल्ह्यात त्याची सुरूवात महावितरणने केली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकही तितकेच प्रामाणिक आहेत. वेळेवर वीज बिल भरण्यात जिल्हा आघाडीवर आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, विद्युत कर्मचारी करत असलेले काम चांगले आहे. नैसर्गिक आपत्तीतही त्यांनी चांगली सेवा दिली आहे. त्यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या सेवेसाठी त्यांचे अभिनंदनही करतो.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनकरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. तसेच प्रत्येक योजनेतील एका लाभार्थ्याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वीजवितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.