सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचा इशारा
कणकवली
सी.एन.जी.गॅस,पेट्रोल,डिझेल इंधन यांच्या भरमसाठ दरवाढी विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्ट पासून रिक्षा टॅक्सी बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल,डिझेल,सी.एन.जी.गॅस इंधन यांच्या भरमसाठ दरवाढ व महागाईने उच्चांक गाठला आहे.त्यामुळे कधी नाही इतके रिक्षा टॅक्सी चालक अडचणीत येऊन बेजार झालेले आहेत. महाराष्ट्र शासन व परिवहन प्रशासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे ज्वलंत प्रश्न,न्याय मागण्या,भाडे दरवाढ प्रलंबित आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटना व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने याबाबत सातत्याने पत्रव्यवहार,निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे.परंतु दरवेळेस शासन परिवहन प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून निव्वळ आश्वासना पलीकडे काहीच केले जात नाही.प्रशासनाकडून रिक्षा टॅक्सी चालक,कष्टकरी यांच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना तमाम कष्टकरी रिक्षा टॅक्सी बांधवांची झालेली आहे.
गेंड्यांच्या कातडीचे पांघरूण घेतलेल्या प्रशासनाला जागे करून आपल्या प्रलंबीत मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट २०२२ रोजी रिक्षा टॅक्सी बंद ठेऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी आमच्या न्याय मागण्यांचा जाणीवपूर्वक विचार करून आमच्या व्यथा व मागण्या शासन दरबारी कळविण्यात याव्यात अशी मागणी या लेखी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,सिंधुदुर्ग यांना देऊन लक्ष वेधण्यात आले आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासोबत विविध विषयांवरती चर्चा करण्यात झाली.यावेळी प्रामुख्याने कणकवली शहरातील पटवर्धन चौक या ठिकाणी अजून एक वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी दिले. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये छोट्या नंबर प्लेट लावून ज्या गाड्या फिरतात त्यांच्यावर आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल.सदरचे निवेदन देतेवेळी रिक्षा संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष तसेच ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, रिक्षा संघटनेचे जिल्हा सचिव सुधीर पराडकर, तसेच ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज तोरस्कर, कणकवली तालुका सचिव मनोज वारे व अन्य रिक्षा चालक उपस्थित होते.