You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व महामार्ग बाधितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागेश मोरये यांचे उद्या २५ जुलैला आमरण उपोषण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी व महामार्ग बाधितांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागेश मोरये यांचे उद्या २५ जुलैला आमरण उपोषण

कणकवली

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत. तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही. या सर्व मुद्द्यांबाबत लेखी स्वरुपात समाधानकारक उत्तरे द्यावीत. अन्यथा २५ जूलैला कणकवली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असून नांदगांव पंचक्रोशीतील नागरिकही माझ्यासमवेत साखळी उपोषणास बसतील, असा इशारा जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी जि . प . सभापती नागेश मोरये यांनी महामार्गचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मोरये यांनी निवेदनात म्हटले आहे की, महामार्गाच्या अपूर्ण कामांच्या सध्यस्थितीबाबत आम्ही यापूर्वीही तक्रार अर्ज केले आहेत. मात्र अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. नांदगांव मोरयेवाडी येथे हायवेला पूर्वी सहा पाईप होते. पण , ते रद्द करुन साईडच्या गटाराला जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पाच फुट रस्ता पाण्यात जातो. तेथील काही घरांभोवतीदेखील मोठ्याप्रमाणात पाणी साचते. नांदगांव तिठा येथील श्री देव कोळंबा मंदिर ते खानोलकर घरापर्यंत दुतर्फा गटार व्यवस्थित न बांधल्यामुळे, फाऊंडेशन चुकीच्या पध्दतीने वापल्यामुळे, निकृष्ट बांधकामामुळे गटारे तुंबलेली आहेत. नजीकच सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे. पण, संपादित जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत तेथे काम करण्यात येऊ नये. नांदगाव येथील सर्व्हिस रोडची रुंदीही कमी आहे. जोडरस्त्यांची उंची वाढविण्याची व डांबरीकरणाची गरज आहे. हायवेपासून दाट वस्ती असलेल्या भागापर्यंत रस्त्याला दिवाबत्तीची सोय केलेली नाही. ओटव माईण फाटा ओव्हर ब्रिजवरील स्ट्रीट लाईट कायम बंद असते. रस्त्याच्या बाजूला असलेली नळयोजनेची पाईप लाईन गटाराचे बांधकाम करतेवेळी वारंवार खोदून पाईप लाईन नादुरुस्त होत आहे.

पुल, मोऱ्या चुकीच्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे पाणी साचून अनेकांचे नुकसान होत आहे. नळयोजनेची लोखंडी पाईप लाईन चुकीच्या पध्दतीने घातलेली आहे. पाण्याचा प्रवाह उलट दिशेने फिरवल्याने नांदगांव येथील शाळा इमारतीचे नुकसान होत आहे. शाळेच्या जमिनीचा मोबदलाही मिळालेला नाही. संपादीत जमिनीचा मोबदला केव्हा पाठवला याची माहिती मिळावी व चुकीचे काम करणारे अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी. चुकीने केलेल्या कामाबाबत कंत्राटदार व शाखा अभियंत्यावर कडक कारवाई व्हावी. ओटव माईण ब्रीजवरून येणारे पाणी शाळा शाळेच्या इमारतीत घुसत आहे. गटारे पक्की नसल्याने देव कोळंबा परिसरात व बाजूच्या शेतात पाणी घुसत आहे. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता आहे. नांदगांव येथील ओव्हरब्रीजचे काम चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे नविन हायवेची जागा शिल्लक राहिली. त्यामुळे आता नव्याने संपादन करावे लागते. कार्यकारी अभियंता ओटवणेकर यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. नांदगाव तिठा ब्रिज ते बेळणे हद्दीपर्यंत हायवेच्या मध्यापासून किती मीटर जागा संपादित केली, सर्व्हिस रोडसाठी किती जागा संपादीत केली याची लेखी माहिती मिळावी.

सर्व्हिस रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नांदगांव हायवेतिठ्यावर जागा उपलब्ध नसल्यामुळे रिक्षावाले कोठेही रिक्षा लावत असतात. त्यांना रिक्षा स्थानक उपलब्ध करून देण्यात यावे. चुकीच्या मार्गाने स्टॉल उभारले असतील तर ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत. नांदगांव तिठ्यावर अंडरपाईप टाकल्याने पाणी निचरा होणे कठीण झालेले आहे. नांदगाव शाळा नं १ समोर झेब्रा लाईन व डांबरीकरण त्वरीत करावे. यापूर्वी नांदगांव सरपंच यांनी समस्यांबाबतचे पत्र पाठवले होते. पण, याबाबत योग्य स्पष्टीकरणही मिळालेले नाही. पूर्वी जे नाले वंशपरंपरेने वाहत होते त्या ठिकाणी चर काढून दुसऱ्या नाल्याला जोडल्यामुळे प्रवाह बदलून इतर ठिकाणी पाणी सोडलेले आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. वरील मुद्याबाबत लेखी स्वरुपात समाधानकारक उत्तरे मिळावीत. अन्यथा उपोषणाला बसणार असून याबाबत वेगळी नोटीस दिली जाणार नाही. त्यावेळच्या परिणामास सर्वस्वी महामार्गप्राधिकरण विभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा