You are currently viewing वारस (भाग १४)

वारस (भाग १४)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री आसावरी इंगळे लिखित अप्रतिम कथा

“हं… हे बघा…कन्येचा पायगुणच या घराची पडझड थांबवू शकेल.”, त्यांनी घराकडे पाहत म्हटले.

“काय?”

“हो..निघतो मी!”, गुरुजी तडक निघाले अन गेलेही. ते कुणाकडेही जास्त वेळ थांबत नसत.

“आता काय करायचं रे..?”, शालूने काळजीने विचारले.

राघो काहीच बोलला नाही. त्याला जुईची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. ती गेली तेव्हापासून हे घडत होतं, यापेक्षाही ती नसल्याने घरातलं चैतन्यच जणू हरवलं होतं.. राघो अस्वस्थ झाला…

तिला शोधायला म्हणून त्याने गाडी काढली तितक्यात त्याला फोन आला. गावाबाहेरील एका तळ्यावर एक छोटी मुलगी रडत बसली होती. फोनवर वर्णन केल्याप्रमाणे ती जुईच वाटत होती. तो तडक निघाला..गावाबाहेरील तळ्यावर पोहचला..रडणारी मुलगी जुईच होती!

“जुई..”, त्याने आवाज दिला तसं तिने वळून पाहिले. बापरे! राघो.. ती त्याच्यापासून दूर पळायला लागली. तिने पाण्यात पडू नये म्हणून राघोही तिच्यामागे सावधगिरीने पळू लागला. तरी अचानक तिचा पाय घसरलाच आणि ती तळ्यात पडली.

“जुई…”, तो जोरात ओरडला. क्षणाचाही वेळ न दवडता त्याने पाण्यात उडी मारली. ती लगेचच त्याच्या हाती आली. त्याने तिला पाण्याबाहेर काढले. तिच्या पोटातील पाणी बाहेर काढले. काही वेळाने ती शुद्धीवर आली. त्याला पाहून पुन्हा पळायचा प्रयत्न करू लागली. त्याने तिला पकडून ठेवले होते.

“मी राघो आहे बाळां..तुझा बाबा..”. ती अविश्वासाने पाहू लागली.

“कुठे गेली होती तू इतके दिवस? तळ्याजवळ कशी आली?”, त्याने काळजीने विचारले. त्याचे उत्तर देण्याइतकी तिला समज आली नव्हतीच. ते राघोच्याही लक्षात आले. जुई मिळाली याचाच आनंद त्याला जास्त होता.

“चल..”

“मी..मला देवबाप्पाकले ज्यायचं..आई मन्ते, देवबाप्पा सगल्यांचं दुखः दूल कलतो. माज्या आईच्य पन कलेल..ती सालकी ललत अचते..”

“बस..आता कुणी रडणार नाही..चल बाळा..”, त्याने तिला प्रेमाने जवळ घेतलं.

“आई..”

“हो..हो.. आईकलेच ज्याऊ.. छोत्या आईकलेही ज्याऊ बलं कां ज्युई..”, तो तिच्यासाखे बोबडं बोलला.

थोड्याच वेळात दोघेही घरी आले. मध्यंतरी त्याने पटपट त्याच्या शर्टाने तिचे अंग पुसले. सुदैवाने त्याच्या गाडीत तिचे एक-दोन ड्रेसेस होते.. म्हणजे तोच घेऊन फिरत होता..तिची आठवण म्हणून! ते कामी आले! शालू आणि कामिनी डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत होत्या.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा