देवगड
ज्यावेळी आमची सत्ता होती त्यावेळी आम्ही एक दिवस आड पाणी देत होतो, मात्र आता आठ दिवस चार दिवस आड पाणी दिले जाते .नळ योजना महिनाभर आमच्या ताब्यात द्या .देवगड जामसांडेच्या जनतेला पाणी पुरवून दाखवतो. असे आव्हान माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी विलास साळस्कर यांना दिले आहे.
नळयोजनेच्या दुरूस्तीसाठी खर्च झालेल्या १ कोटी ४७ लाखांचा मागाील सत्ताधा-यांकडून लेखाजोखा मागणा-या शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी शिवसेना नगराध्यक्षा, नगरसेवक यांना विश्वासात घेवून परिपुर्ण माहिती घ्यावी उगाच चुकीचे आरोप करून उंटावरून शेळ्या हाकू नये.
देवगड जामसंडे शहरातील विकासकामांबद्दल खोटे आरोप करून त्रास देण्याचे काम करू नये असा इशारा माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर आणि भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी दिला आहे.
देवगड येथील आमदार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कींजवडेकर, शहरअध्यक्ष योगेश पाटकर, युवामोर्चा शहरअध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, रूचाली पाटकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर उपस्थित होते.
देवगड जामसंडे न.पं.मधील मागील सत्ताधा-यांनी २०१९ मध्ये दहिबांव नळयोजना दुरूस्तीसाठी सुमारे १ कोटी ४७ लाख रूपये खर्च केले गेले कोठे या साळसकर यांनी केलेल्या प्रश्नाला चांदोस्कर यांनी सविस्तर उत्तर दिले.यामध्ये २७ फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेमध्ये नळपाणी योजना दुरूस्तीसाठी ठराव क्रमांक १५ मध्ये ५२ लाख ३४ हजार ९४८ रूपये रक्कम वेळवाडी साठवण टाकीसाठी खर्च, ठराव क्रमांक १६ मध्ये ५१ लाख ७० हजार ११६ रूपये देवगड खाकशी ते पेट्रोलपंप जीआय पाईपलाईन टाकणेसाठी खर्च व ठराव क्रमांक १६ मध्ये ४३ लाख ३ हजार २२९ रूपये रक्कमेपैकी २९ लाख वार्षिक देखभाल दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आले यामुळे साळसकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे मागील सत्ताधाऱ्यांवर चुकीचे आरोप करू नयेत.मागील सत्ताधाऱ्यांचा काळात देवगड जामसंडेवासियांना एक दिवस आड पाणीपुरवठा होत होता मात्र शिवसेना आघाडीची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यात नियोजनशुन्य कारभारामुळे पाणीप्रश्न गंभीर झाला व नागरिकांना सहा सहा दिवस पाणी येत नाही.जमत नसेल तर विरोधकांकडे फक्त एक महिना योजना चालविण्यासाठी द्यावी देवगड जामसंडेवासियांना एक दिवस आड पाणीपुरवठा पुर्ववत करू असे आव्हान चांदोस्कर यांनी केले.
स्वतंत्र नळयोजनेचे काम ९० टक्के मार्गी लावेल ही वल्गना साळसकर यांनी करू नये.मागील सत्ताकाळात नळयोजना मंजुरीच्या अंतीम टप्प्यापर्यंत सर्व प्रक्रिया आम्ही पार पाडल्या आहेत.नळयोजना मंजुरीचा विषय उरला आहे तो सुध्दा आता राज्यात भाजपाची सत्ता आली आहे तो लवकरच मार्गी लागेल.साळसकर यांना हा प्रश्न सोडवायचा असल्यास शिंदे गटात सामील व्हावे असा टोला चांदोस्कर यांनी लगावला.
मागील सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेने केले.कावलेवाडी व पवनचक्कीकडे जाणाऱ्यां रस्त्याचा कामात भ्रष्टाचार झाला असून ठेकेदाराचे बील अदा करू नये अशी तक्रार केली त्यानंतर बील अदा करण्यात आले नाही मात्र शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यातच ठेकेदाराचे अंतीम बील नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या सहीने अदा करण्यात आले यावरून भ्रष्टाचाराचे निराकरण केले की टक्केवारी घेतली असा सवाल चांदोस्कर यांनी साळसकर यांना केला.
हाच विषय किरण मराठे घर ते बापट घर या रस्त्याचा आहे हा रस्ता तीन महिन्यात उखडला शिवसेनेच्या कारभाराचा हा उत्कृष्ट नमुना असून आमच्यावर आरोप करणारे भ्रष्टाचारी निघाले असे मतही चांदोस्कर यांनी व्यक्त केले आहे