मालवण (बिळवस) :
मसुरे गावची मूळमाया बिळवस जलमंदिर येथील श्री सातेरी देवीचा आषाढ जत्रोत्सव २२ जुलै रोजी संपन्न होत आहे. कोकणातील एकमेव जलमंदिर अशी ओळख असलेल्या श्री सातेरी देवीच्या दर्शनाची भाविकांना आस लागली असून यात्रा पूर्व तयारीला वेग आला आहे. येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे देवस्थान मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाविकांच्या दर्शन रांगेचे नियोजन करण्यात येत आहे.
यावर्षी पक्क्या स्वरूपाचा मंडप दर्शन रांगेत असणार आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार आहे. गेली दोन वर्षे हा जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्भूमीवर गाव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र सर्व भाविकांना याची देही याची डोळा देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेता येणार असल्याचे विक्रमी गर्दीचे संकेत मिळत आहेत.
गावात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा भाविकांना सोई सुविधा पुरविण्या बाबत नियोजन करण्यात आले आहे. यात्रेकरू भाविकांसाठी हंगामी स्वरूपाची हॉटेल, मिठाई दुकाने उभारण्यास प्रारंभ झाला आहे.
जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी विधिवत पूजन झाल्यानंतर ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. पावसाळ्यामध्ये होणारा हा एकमेव जत्रोत्सव असून मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवात उपस्थिती दर्शवतात. भाविकांनी देवीचे दर्शन घेणे, ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचा आवाहन श्री सातेरी देवलय ट्रस्ट व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.