कुडाळ :
कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांना रोटरी क्लब कुडाळच्यावतीने दिल्या जाणाऱ्या रोटरी एक्सलन्स अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकाचा रोटरी क्लब ऑफ कुडाळ *रोटरी एक्सलन्स अवॉर्ड* देऊन सन्मानित करत असते.
उमेश गाळवणकर हे गेली अनेक वर्ष कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात भरीव असे कार्य करत राहिले आहेत. कोरोना काळात त्यानी जीव धोक्यात घालून रुग्णासाठी संस्थेच्या परिसरात कोरोना सेंटर सुरू करून जे काम केले आहे ते उल्लेखनीय व बहुमोल असेच आहे. या सर्वांची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे रोटरी क्लबच्या वार्षिक पदग्रहण सोहळ्यात डिस्टिक गव्हर्नर इलेक्ट बोरसादवाला (कोल्हापूर) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल असिस्टंट गव्हर्नर दीपक बेलवलकर, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, गव्हर्नर एरिया एड प्रणय तेली, कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, सायली प्रभू, रोटरी क्लब कुडाळचे सेक्रेटरी दिनेश आजगावकर, रोटरी क्लब कुडाळचे माजी अध्यक्ष अभिषेक माने, माजी अध्यक्ष सचिन मदने, खजिनदार डाॅ. संजय केसरे, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे विद्यमान अध्यक्ष अमित वळंजू व इतर सर्व सदस्य उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून उमेश गाळवणकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.