मालवण :
मालवण नगर परिषद आयोजित प्लस्टिक मुक्त मालवण शहर स्पर्धेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शेकडो स्पर्धकांचा सहभाग , 2500 इको ब्रिक्स च्या माध्यमातून जवळ जवळ 500 किलो प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर.
प्लास्टिक हे अविघटनशील आहे व पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केल्यास जैवविविधतेवर विपरीत परिणाम करणारे आहे. मालवण शहर पर्यटनदृष्ट्या नावाजलेले शहर असून शहराला सुमारे एकूण ८ किमी लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. शहरात कचऱ्याच्या स्वरुपात तयार होणारे अविघटनशील प्लास्टिक येथील सागरीजीव, प्राणी, पक्षी व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे असून शहरात प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून प्लास्टिक वस्तूंच्या पर्यायी साधनांच्या वापरास प्राधान्य देण्याची आवश्यकता लक्षात घेता मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इकोब्रिक्स) स्पर्धा आयोजित करून; नागरिकांना यास्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
या स्पर्धेत इयत्ता पहिली-दुसरीच्या छोट्या मुलांपासून ते शिक्षक, पत्रकार, शहरातील सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी हे सर्वजण सहभागी झालेले दिसून आले. शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग हेऊन जवळ जवळ २५०० इकोब्रिक्स तयार करून नगर परिषदेकडे जमा केल्या. या जमा झालेल्या इकोब्रिक्स च्या माध्यमातून एकूण ६०० किलो प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर झालेला आहे. नगरपरिषदे कडून या ब्रिक्सचा वापर गार्डनिंग व सुशोभीकरणासाठी केला जाणार आहे.
मालवण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी प्लास्टिक मुक्त शहर एक लोकचळवळ व्हावी अशी आशा व्यक्त करत मालवण नगर परिषद नेहमीच शहराची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिक मुक्त शहरासाठी तत्पर राहील असा मानस व्यक्त केला तसेच त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शहर समन्वयक निखिल नाईक, लिपिक महेश परब, मंदार केळुसकर, स्वच्छता निरीक्षक प्रसाद भुते, राजा केरीपाळे, आनंद वळंजू, स्वच्छता कर्मचारी सुमित हसोळकर व सुमेध जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.