*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री -आसावरी इंगळे, (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*
*वारस (भाग ९)*
कामिनीची कथा ऐकून शालूचे पाय थरथरू लागले. म्हणजे मागच्या वर्षी गर्भपात घडवून आणला होता! किती विश्वास ठेवला होता तिने त्याच्यावर. सगळ्यांचा विरोध पत्करून तिने त्याच्या गळ्यात माळ घातली होती. कॉलेजपासून दोघींमध्ये शीतयुद्ध असूनही कामिनीने शालूला सतर्क केलं होतं पण तिने तिच्याकडेही दुर्लक्ष केलं होतं! ..किती मोठी चूक झाली होती तिच्याकडून! तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
“मला माफ कर कामिनी…मी तुझी कळकळ नाही समजू शकले.” ती ओक्साबोक्शी रडू लागली. तितक्यात राघोच्या गाडीचा होर्न वाजला. तिने झटपट डोळे पुसले. ती कामिनीला भेटली हे तिला राघोला कळू द्यायचे नव्हते.
“जूईची काळजी घे..मी उद्या येईन.” ती घाईघाईत खाली गेली.
त्यानंतर काही दिवस सगळं सुरळीत चाललं होतं. शालू नोकरांची नजर चुकवून जमेल तशी कामिनीकडे जाऊ लागली. दोघींनाही सुख दुखः वाटायला एकमेकींशिवाय आधाराचे असे कुणीच नव्हतं. जुई शालूला ‘छोटी आई’ म्हणू लागली होती. राघोची नजर चुकवून शालू कामिनीला खाण्याचे पदार्थ, कपडे पुरवू लागली. राघोने कामिनीकडे जाणं सोडलं असल्याने ते त्याच्या लक्षात येणे शक्यही नव्हतं. यानंतर राघोने म्हटलं तरी डॉक्टरांकडे जायचं नाही, शालूने मनाशी निर्धार केला. परंतु तो जास्त काळ टिकू शकला नव्हता. आज राघोने व्यवस्थित कोंडी केली होती. त्याच्या हातात जुई अलगद सापडली होती. इतक्या कोवळ्या आणि मोहक जीवाची, त्याच्याच पोटच्या गोळ्याची त्याला जराही दया आली नव्हती की प्रेम वाटलं नव्हतं! मुलाच्या हव्यासापुढे मुलीच्या जीवाचं काहीच मोल नसावं? राघो असा कसा निघाला? की तो तसाच होता..आपणच त्याला ओळखण्यात चूक केली? आता एकतर जुई जगू शकणार होती..नाहीतर तिचे बाळ…खूप विचार केल्यावर तिने निश्चयाने उठली.
थोड्यावेळाने कामिनी खाली आली तेव्हा तिने शालूला डॉक्टरकडे जायला तयार झालेले पाहून आश्चर्य वाटले.
“तू..तू तयार झालीस?”,
“हो..”
“पण..” एवढे बोलून ती गप्प झाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती बोलणार तरी काय होती! तिचं तरी काय चाललं होतं राघोपुढे? तिच्या मुलीवर तर रोजच टांगती तलवार लटकत होती.
मागील वर्षीप्रमाणेच शालूची तपासणी झाली. मागील वेळेस तपासणीबाबत अनभिज्ञ असलेल्या शालूला यावेळेस काय चालू आहे याची पूर्ण कल्पना होती. तिने स्वतःला देवाच्या भरवशावर सोडले होते. अचानक राघो आत आला..
“शालू..शालू…”, त्याने अत्यानंदाने शालूचा हात दाबला. “यावेळेस काही अडचण नाही. सगळं ठीक आहे. तू लवकरच आई होणार.”
“काय!”, शालू आनंदाने ओरडली…बातमी होतीच तशी! ती आई होणार होती..राघोने तिला सांगितले नसले तरी तिला मुलगा होणार, हे निश्चित होतं!
*(क्रमशः)*