कोणाला बसतो फटका तर कोण म्हणतो लाव त्यावर मटका
व्यसन मग ते चांगले असो अथवा वाईट माणूस त्या व्यसनाच्या पायी सर्व काही विसरून जातो आणि व्यसन अक्षरशः गळ्यात बांधून फिरतो. चांगली व्यसने असणारा माणूस ते जपतो, जतन करतो, त्याची शिदोरी बनवून ठेवतो…परंतु वाईट व्यसन असणारी माणूस मात्र कुठल्याही थराला जाऊन त्याचे प्रदर्शन मांडतो. आपल्या मालवणीत म्हणतात… “कोणचा काय तर हेंचा काय…”
याचाच प्रत्यय आज आला तो म्हणजे मटक्याच्या व्यसनात पार बुडालेली एक जोडी सावंतवाडीत एका प्रसिद्ध व्यक्तीचा वाढदिवस असलेल्या ऑफिसच्या दारात येऊन पोहोचली. मटक्याच्या नादात वेडी झालेली ही माणसे कुठून तरी एखादा आकडा शोधत असतात, मग एखाद्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात त्या गाडीचा गाडीचे नुकसान झाले किंवा जीवित हानी झाली तरी देखील हे लोक त्या गाडीचा नंबर काय आहे? आणि त्याचा मटक्यासाठी आपल्याला काय फायदा होणार? याचाच विचार करत असतात… म्हणजे मद्यावरचे लोणी खाण्याचाच हा एक प्रकार…!
मटक्याच्या नादापायी त्या पुढाऱ्याच्या ऑफिस समोर पोहोचलेली ही जोडी ऑफिस मधील एका व्यक्तीला बाहेर बोलावून *हा कितवा वाढदिवस?* असा प्रश्न विचारू लागली. त्यावेळी ऑफिस मधील तो कार्यकर्ता देखील मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहू लागला… आणि कोणीतरी दोघेजण हा कितवा वाढदिवस? असा प्रश्न विचारत असल्याचे इतरांना सांगू लागला.
एका पुढाऱ्याचा वाढदिवस म्हटल्यानंतर कदाचित कितवा वाढदिवस हे जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता असेल असे वाटून त्या जोडगोळी कडे चौकशी केली असता, मटक्याचा नंबर लावण्याकरिता त्यांना वाढदिवसाच्या आकडा पाहिजे होता हे समजल्यानंतर एकच हशा पिकला… आणि प्रत्येक जणांच्या तोंडातून एकच वाक्य बाहेर पडले ते म्हणजे “कोणचा काय तर हेंचा काय…”
उज्वल भवितव्यासाठी मेहनत आणि कष्टातून पैसे कमविण्यापेक्षा मटका, दारू, जुगार अशा गैरधंद्यातून पैसे कमविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेच हे एक उदाहरण…!