You are currently viewing कोरोना तिथेच राहिला..

कोरोना तिथेच राहिला..

कोरोना तिथेच राहिला..

कोरोनाचा अभ्यास हा,
कित्येकांनी घरातच केला,
अगदी पदव्याही घेतल्या.
कोणी डिग्री डिप्लोमा,
कोणी मास्टरेट केली,
घरोघरी एक वैद्यही बनला.
पण…
कोरोना मात्र तिथेच राहिला.

कित्तिक झाले अर्क काढे,
वाफ घेऊनी घसा फुलला.
गरम पाण्याचा मारा चारदा,
फुललेल्याच घशावर झाला.
मिरी जायफळ लवंगीतही,
गुळाचा तो गोडवा उतरला..
पण …
कोरोना मात्र तिथेच राहिला.

दवाखान्याची दारे बंद केली,
ताप सर्दी खोकला तो झाला.
स्वॅब घेतला गेला नाकातून,
कित्येक झाल्या तपासण्या.
निगेटिव्ह पेक्षा जास्तच जरा,
पॉझिटिव्हचा तिटकारा वाढला.
पण…
कोरोना मात्र तिथेच राहिला.

सॅनिटायझर फवारले गेले,
नाक तोंडावर मास्क आला.
साधाच तो रोग म्हणता म्हणता,
कित्येकांचा जीव परागंदा झाला.
पाच फुटी त्या देहावरही,
सूक्ष्म विषाणू भारीच पडला.
पण…
कोरोना मात्र तिथेच राहिला.

व्याधीग्रस्त वृद्ध अन जेष्ठ,
यांनाच होतो त्रास समजला.
तरुण तुर्क बेकिफिर वागला,
कोरोना विषाणू त्यांनाही नडला.
अंगावर ज्यांनी दुखणे काढले,
तोच आपल्या जीवास मुकला.
पण…
कोरोना मात्र तिथेच राहिला.

अनेक उपाय करून थकले,
औषधावीन रोगी बरेही झाले.
प्रियजन ज्यांस सोडूनी गेले,
दर्शन त्यांचं ना शेवटचंही झाले.
गाडूनी दुःख मनात खोलवर,
हतबल मानव जगणे विसरला.
पण…
कोरोना मात्र तिथेच राहिला…!!

(दीपी)
दीपक पटेकर
#८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा