कणकवली :
कणकवली तालुक्यातील गोपुरी आश्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोपुरी आश्रम, वागदे येथे ‘चला करूया चिखलधुनी’ या खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोपुरी आश्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग, युरेका सायन्स क्लब कणकवली च्या सहकार्याने ‘चिखल धूणी’ अर्थात भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. युरेका क्लबच्या बच्चे कंपनीने भात लागवडीची माहिती करुन घेतली. लहान मुलांनी चिखलात ऊड्या मारण्याचा आनंदही लुटला.
भात रोप लागवड ते प्रत्यक्षात आपल्या ताटात येणारा भात इथपर्यंतची प्रक्रिया युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केणी मॅडम यांनी मुलांना समजावून दिली. अगदी छोटी मुल सुद्धा सहभागी झाली होती. नशाबंदी मंडळच्या अर्पिता मुंबरकर यांनी मुलांना व्यसन मुक्तीची प्रतिज्ञा दिली. गोपुरी आश्रमाचे संचालक बाळू मेस्त्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात संदिप सावंत (कणकवली), सुषमा केणी, शितल वाळके, गोपुरीच्या संचालक अर्पिता मुंबरकर, संचालक बाळू मेस्री, सभासद योगेश सावंत, सावंत, नितीन जावळे, बाबू राणे, नितांत चव्हाण यांनी भात लागवडीसाठी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे सहभागी मुलांचे पालक उपस्थित होते.