*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*
*कावळा*
*मुक्तछंद*
सहा वर्षांचा मुलगा माझा
धावत आला बावळा
काम सांगू नका म्हणाला
शिवलाय मला कावळा
गच्चीवर खेळता खेळता
जवळून माझ्या गेला
शी शू विटाळून अंगा
स्पर्शच त्याने केला
चला बाबा कंबर कसून
लगोलग कामा लागा
काय कुठे असे ठेवले
सांगतो तसेच वागा
लांब बसून सुद्घा करीन
कामात तुमच्या लडबड
कंटाळा करून झोपू नका
ऐकून माझी बडबड
अंथरूण माझे दूर ठेवी
गुंडाळून मी कपडे
हवे नको ते पुसा मला
लक्ष द्या हो इकडे
शिवू नका मला कोणी
ताट माझे ठेवा दूर
आवडते पदार्थ वाढून
शिरा पुरी भरपूर
तीन दिवस आराम करून
चौथ्या दिवशी मोकळा
शिरेन तुमच्या कुशीत बाबा
उडून गेला कावळा
भूऽर उडून गेला कावळा
— हेमंत कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई