You are currently viewing वारस (भाग ६)

वारस (भाग ६)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री  आसावरी इंगळे लिखित अप्रतिम कथा

त्यानंतर जवळपास महिना दीड महिना रोजच शालू जुईची बागेत यायची वेळ पाहून इतर नोकरांना बाहेरील काम देऊन बगीच्यात जाऊ लागली. शालूला तिचा लळा लागल्यासारखा झाला होता. एक दिवस मात्र जुई बगीच्यात दिसली नाही. आपली वेळ चुकली असेल, शालूने विचार केला. दुसर्या दिवशीही जुई दिसली नाही. तिसराही दिवस तसाच गेला. चौथ्या दिवशी शालूचा संयम सुटला. तिने माळी काकांना जुईबद्दल विचारले.

“आजारी असन ती.”, ते उत्तरले.

“असन..म्हणजे? तुम्हाला माहिती नाही?”

“मंजी..आजारी हाय लेकरू.”

“आजारी? काय झालंय तिला..?”, तिने काळजीने विचारले.

“ज्वर हाय..”, असे काहीसे अस्पष्ट बोलत माळी काका गायब झाले.

बाहेरून वर जाण्यात अर्थ नव्हता. कुणाला दिसले असते तर राघोने गोंधळ घातला असता. आतून जायचे म्हटले तर जिन्याला भलेमोठे कुलूप लावलेले! काय करावे! इतक्यात त्या कुलुपाची दुसरी चावी राघोच्या कपाटात ठेवली असल्याचे तिला आठवले. तिने घाईघाईत कपाट तपासले. सुदैवाने ते उघडे होते..!
दुपारपर्यंत कसाबसा वेळ काढल्यानंतर नोकरांना बाहेरचे काम देऊन ती आतल्या जिन्याने वर गेली. वरचे दार बंद होते. दार वाजवण्या आधी थोडी कसरत करून ती बाजूच्या खिडकीतून आत डोकावली. जुई पलंगावर निपचित पडली होती. तिच्याजवळ कुणी कृश देहयष्टीची स्त्री पाठमोरी बसून तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती. बहुदा थंड पाण्याच्या असाव्या.. शालूने विचार केला. कामिनी? कुठे गेली ती?

“ओह! पोरगी तापाने फणफणत आहे आणि मुलीला आयाच्या स्वाधीन करून महाराणी आराम करते आहे!” तिला कामिनीचा खूप राग आला. त्याच रागात तिने दार खडाखडा वाजवलं! दार उघडलं गेलं..दारात तीच कृश स्त्री उभी होती. तिला पाहून शालू फक्त पडायचीच बाकी होती!

“तू…तू…”, शालूला पुढे काही बोलवेना..कृश देहयष्टी, म्लान चेहरा, खोल गेलेले डोळे, त्याखाली भली मोठ्ठी काळी वर्तुळे..भग्न..भकास.. ती कामिनी होती! कामिनी! भुरळ पडणारे सौंदर्य, आत्मविश्वास कुठे लवलेश नव्हता!

“तू..तुम्ही.. तुम्ही…तुम्ही जा…”, ती घाबऱ्या आवाजात बोलली.

“कामिनी.. तू.. तू..कामिनीच आहे नं?”, शालू अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती!

तिने मान खाली घातली.

*(क्रमशः)*

प्रतिक्रिया व्यक्त करा