जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आसावरी इंगळे, (जामनगर) यांची अप्रतिम कथा
अनेक चांगले स्थळ नाकारून एका विवाहित पुरुषाशी आपल्या सुंदर मुलीने विवाह करावा, ही गोष्ट शालूच्या घरी पसंत पडणारी नव्हतीच. अर्थात शालूच्या निग्रहापुढे त्यांचे काहीच चालले नाही. राघोच्या प्रथम पत्नीचे संमतीपत्र तिच्यासोबत असल्याने कायद्याची बाजूही पक्की होती. सर्वांचा विरोध धाब्यावर बसवून शालू राघोसोबत लग्नाला तयार झाली होती. राघोसोबत विवाह तर होणार होताच शिवाय कामिनीची चटवायची नामी संधी तिला मिळाली होती आणि तिला ती गमवायची नव्हती!
राघो-शालूचा विवाह रजिस्टर पद्धतीने झाला. शालूच्या घरचे कुणीही विवाहाला उपस्थित नव्हते. त्यांनी शालूशी संबंध तोडले होते. शालूला त्याची विशेष फिकीरही नव्हती! ती स्वप्न लहरींवर तरंगत होती!
शालू राघोच्या गावी आली तेव्हा दुपारची वेळ होती. गावात बऱ्यापैकी सामसूम होती. रस्त्यातील गावकर्यांनी राघोला पाहून नमस्कार केला…सोबत शालूलाही! शालूला पुन्हा मोहरून आलं! आता ती गावची मालकीण होती! राघोचे तीन मजली घर, बाहेर प्रशस्त अंगण पाहून तिचा दीड दिवसाच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला. पूर्ण घर बाहेरून फुलांनी सजवले होते. तीन चार नोकरांनी तिचे स्वागत केले.
“तिसरा मजला कामिनीने स्वतःसाठी ठेवला आहे. तुझ्याशी लग्न होतंय कळल्यानंतर तिने मागच्या बाजूने जिना काढलाय…तुझ्याशी भेट होऊ नये म्हणून. शालू.. मला वाटते तिच्या डोक्यातही थोडा फरक पडलाय. टोटकेही करते बहुदा ती.. तू तिच्या नजरेस पडू नये असे मला वाटते.”, राघो काकुळतीने म्हणाला.
“अरे पण..”, कामिनीने आपल्याला राघोच्या पत्नीच्या रुपात पहावे, अशी शालूला मनातून वाटत होते.
“प्लीज शालू.. मला तुला गमवायचे नाही गं..”
“हं.. ठीक आहे राघो.. फक्त तुझ्यासाठी मी तिला स्वतःहून तरी कधी भेटणार नाही.” ती थोडी निराशच झाली होती. किती दिवस असे चालेल? कधी ना कधी तर गाठभेट होईलच. तिने मनाला समजावले.
“हे घे…” राघोने तिच्यासाठी आणलेला सोन्याचा नेकलेस आणि बांगड्या तिला दिल्या.
“हे.. हे काय?”.. शालू हरखून गेली.
“भेट..पहिल्या रात्रीची..” त्या लखलखत्या भेटीत शालू कामिनीचा विषय पूर्णपणे विसरून गेली!
*(क्रमशः)*